Chetan Tupe : वाघोलीतील वाहतूक उपयायोजनेबाबत आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत वेधले लक्ष

वाघोली : वाघोली येथील केसनंद फाटा परिसरामध्ये डिसेंबर २०२४ मध्ये मध्यरात्री मद्यधुंद डंपर चालकाने ९ जणांना चिरडल्याची घटना व वाहतूक उपयायोजनेबाबत आमदार चेतन तुपे यांनी विधानसभेत लक्ष वेधले. तर आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी या घटनेमधील करून मृतांच्या नातेवाईकांना मदतीची, असे अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्याबाबतचा तारांकित प्रश्न केला आहे.
विधानसभेत तुपे यांनी वाघोलीतील अपघाताबाबत लक्ष वेधून घेत असताना मद्यपान करून गाडी चालवण्याबाबत कडक नियमावली करावी, असे अपघात टाळण्यासाठी पुणे शहरात फुटपाथवर राहणाऱ्या नागरिकांना महापालिका व पोलीस प्रशासनाने मिळून शेल्टरमध्ये भरती केले जावे, सिग्नल यंत्रणेत एआयचा वापर करण्याबाबतचे मुद्दे मांडले. यावर उत्तर देताना मंत्री योगेश कदम यांनी वाहतूक पोलिसांची संख्या वाढवणे व वाहतूक नियमांची अंमलबजावणी तसेच वाहतुकीबाबत कडक कायदा करण्यासाठी सुधारणा केली जाईल असे सांगितले.
आमदार ज्ञानेश्वर कटके यांनी तारांकीत प्रश्न करून वाघोली येथील डंपर अपघातात ९ जणांना चिरडले त्यामध्ये ३ जणांचा मृत्यू, या प्रकरणी गुन्हा दाखल, अपघातातील मृत व्यक्तींच्या नातेवाईकांना व जखमींना आर्थिक मदत देणे तसेच दोषींवर कारवाई करण्यासह अपघात टाळण्यासाठी काय उपाययोजना केल्या जातील याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला आहे.
यावर मुख्यमंत्री यांनी उत्तर दिले आहे की, वाघोली येथे भरधाव डंपरने केलेल्या अपघातात ९ जण चिरडले असून ३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार डंपर चालक, मालक आणि व्यावसायिक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या अपघातातील मृत्युमुखी पडलेल्या व गंभीर जखमी नागरिकांना व वारसदारांना आर्थिक करण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात आला आहे. असे अपघात टाळण्यासाठी वाहतूक शाखेकडून पुणे शहरात अवजड वाहनांना विहित वेळेत बंदी घातली आहे.





