मुंबई – मशिदींवरील भोंगे उतरवण्याच्या वक्तव्यावरून राज ठाकरेंवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून टीका केली जात आहे. दरम्यान आज राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करत खाज ठाकरे असा उल्लेख केला. तसेच भाजपावाल्यांनी आम्हाला भक्ती शिकवू नये आम्हाला हनुमान चालीसा पाठ आहे म्हणत त्यांनी स्टेजवर हनुमान चालीसा म्हणली. इस्लामपूरातील एनसीपीच्या परिवार संवाद यात्रेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज ठाकरेंसह देवेंद्र फडणवीस, किरीट सोमय्या यांचीही नक्कल केली.
मिटकरी म्हणाले, “पेट्रोल, गॅस, डिझेलवर राज ठाकरे बोलत नाहीत. नकला करतात…चांगला टाइमपास आहे. साहेबांवर बोलले म्हणून मी खाजसाहेब बोललो. निसर्गाने आम्हालाही दोन हात, पाय, डोकं आणि त्यात मेंदू दिला. पण मेंदू कोणाचा गुलाम ठेवावा याचं भान दिलं,” असा टोला यावेळी अमोल मिटकरींना लगावला. मुस्लिमांनी हनुमान चालिसाला विरोध कधी केला? अशी विचारणाही यावेळी त्यांनी केली.
“पहिलं मराठी, अमराठीवर मुद्दा घेतला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव वापरलं,” अशी टीका अमोल मिटकरींनी केली. “बोलताना चेहऱ्यावर काही हावभाव नाहीत. जितेंद्र आव्हाडांना नागासारखा चेहरा म्हणाले. आम्ही नागवंशीय असल्याने नागासारखे चेहरे आहेत,” असं उत्तर यावेळी त्यांनी दिले.