अशोकाची पतझड होऊन वसंत ऋतू फुलाला…; आमदार अमित देशमुख यांची अशोक चव्हाणांवर टीका

नांदेड : नांदेड जिल्हा हा काँग्रेसचा गड असून नांदेडकरांनी नेहमीच काँग्रेसला साथ दिली आहे. आता झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत देखील लोकांनी काँग्रेसला भरभरून मते दिली. त्यामुळे ‘अशोका’ची पतझड होवून ‘वसंत’ ऋतू फुलाला आहे, अशी मार्मिक टीका माजी मंत्री, आमदार अमित देशमुख यांनी केली.
आमदार अमित देशमुख यांनी त्यांचे वडील व माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या शैलीत फटकेबाजी केल्याने अनेकांना विलासराव देशमुखांची आठवण झाली. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची भाषण करण्याची विशिष्ट शैली होती. लातूरच्या मराठवाडी भाषेचा लहेजा, हातवारे आणि बोलण्यातील ठहराव यामुळे विलासराव देशमुख यांचे भाषण ऐकण्यासाठी नेहमी गर्दी होत असे.
एखादा गंभीर विषय देखील मांडताना हलकासा विनोद करताना तो विषय उत्तम प्रकाराने मांडत असत. आज आमदार अमित देशमुख यांनी देखील भाषण करताना वडिलांचा तोच पावित्रा घेतला होता. याची झलक आज नांदेडच्या आढावा बैठकीत दिसली. त्यामुळेच आजच्या भाषणात त्यांनी केलेली टीका विरोधकांना जास्त बोचली असण्याची शक्यता आहे.





