Mitchell Santner Salary : IPL संपताच मुंबई इंडियन्सवर कोट्यवधी रुपये बुडवल्याचा गंभीर आरोप! स्टार खेळाडूचा पॉडकास्टमध्ये खुलासा
Mitchell Santner Salary : आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत फ्रँचायझींपैकी एक असलेल्या 'मुंबई इंडियन्स'वर एका स्टार खेळाडूने मानधनाचे पूर्ण पैसे न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Mitchell Santner Allegations On Mumbai Indians Salary IPL 2026 : आयपीएल २०२६ चा थरारक हंगाम ३१ मे रोजी संपला असून आरसीबीने सलग दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे. मात्र, हा हंगाम संपून अवघे तीन दिवस उलटत नाही तोच क्रिकेट जगतातून एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे. आयपीएलमधील सर्वात यशस्वी आणि श्रीमंत फ्रँचायझींपैकी एक असलेल्या ‘मुंबई इंडियन्स’वर एका स्टार परदेशी खेळाडूने मानधनाचे पूर्ण पैसे न दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. हा खेळाडू दुसरा कोणी नसून न्यूझीलंडचा अनुभवी ऑलराउंडर मिचेल सँटनर आहे.
खेळताना शरीर पणाला लावलं, पण अर्धीच सॅलरी मिळाली!
मिचेल सँटनर हा आयपीएल २०२६ च्या हंगामात दुखापतीमुळे मुंबई इंडियन्ससाठी पूर्ण सामने खेळू शकला नव्हता. ‘द ग्रेड क्रिकेटर पॉडकास्ट’वर बोलताना सँटनरने मुंबई इंडियन्सच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सँटनर म्हणाला, “माझ्या घरी दुसऱ्या बाळाचा जन्म झाल्यामुळे मी पहिला सामना खेळू शकलो नव्हतो. त्यानंतर दिल्लीविरुद्धच्या सामन्यात माझ्या उजव्या खांद्याला दुखापत झाली. या दुखापतीतून सावरून जेव्हा मी पुन्हा संघात पुनरागमन केले, तेव्हा माझ्या डाव्या खांद्याला दुखापत झाली. या दुहेरी दुखापतींमुळे मला संपूर्ण हंगामात केवळ ४ सामनेच खेळता आले.”
पुढे संताप व्यक्त करत मानधनाचा मोठा खुलासा करताना तो म्हणाला, “मला असं वाटलं की मी संघासाठी माझे शरीर पणाला लावत आहे, पण फ्रेंचायझीने माझा हा त्याग लक्षातच घेतला नाही. मुंबई इंडियन्सने माझ्या २ कोटी रुपयांच्या एकूण सॅलरीमधील केवळ अर्धाच हिस्सा (१ कोटी रुपये) मला दिला आहे. फ्रँचायझीची ही वागणूक मला अजिबात आवडलेली नाही.”
🚨 MITCHELL SANTNER OPENS UP ON IPL PAY CUT 🚨
Mitchell Santner revealed that he received only half of his IPL 2026 salary from Mumbai Indians after an injury ruled him out of the season.
Retained for ₹2 crore, Santner admitted the decision “hurt a little bit.” pic.twitter.com/WKs2egTD49
— Hamza Khan (@Hamzakhan17_) June 3, 2026
काय सांगतो आयपीएलचा अधिकृत नियम?
मिचेल सँटनरच्या या खळबळजनक आरोपानंतर आयपीएलमधील खेळाडूंच्या मानधनाचे नियम पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. आयपीएलच्या अधिकृत नियमांनुसार, जर एखादा खेळाडू स्पर्धेच्या दरम्यान किंवा सराव शिबिरात (कॅम्पमध्ये) असताना दुखापतग्रस्त झाला, तर फ्रँचायझीला त्याच्या कराराची पूर्ण रक्कम देणे बंधनकारक असते.
बऱ्याचदा खेळाडूंचे मानधन काही हप्त्यांमध्ये दिले जाते. त्यामुळे सँटनरला उर्वरित पैसे नंतर मिळणार आहेत की मुंबईने त्याचे पैसे खरोखरच कापले आहेत, हे अद्याप पूर्णपणे स्पष्ट झालेले नाही. या संपूर्ण वादावर मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण किंवा बाजू समोर आलेली नाही. मात्र, या प्रकरणाने क्रिकेट वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे.





