पिंपरी | महामार्गावरील रिफ्लेकटर गायब ; वाहनचालकांना करावी लागतेय कसरत

इंद्रायणीनगर,(वार्ताहर) – भोसरीतील पुणे – नाशिक महामार्गावरील दुभाजकांमधील लाइट रिफ्लेकटरची दुरवस्था झाली आहे तर काही ठिकाणी रिफ्लेक्टर नाहीसे झाले असल्याने दुभाजक अपघात प्रवण क्षेत्र बनत आहे. रात्री समोरून येणाऱ्या वाहनांच्या दिव्यांचा प्रकाश थेट वाहन चालकांच्या डोळ्यावर पडत आहेत.
यामुळे रात्री वाहने चालविताना वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे महामार्ग धोकादायक बनला असून रात्रीच्या वेळी अपघातांची मालिका वाढण्याची शक्यता बळावली आहे.
रस्ता दुभाजकावर रिफ्लेकटर असल्यास समोरून येणाऱ्या वाहनाच्या दिव्यांचा प्रकाश रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या वाहनांच्या कांचावर पडत नाही.
यामुळे वाहन चालविणे सुकर होते. रिफ्लेकटर तुटल्याने प्रकाश थेट काचेवर पडल्याने रात्रीच्या वेळी पुढील रस्ता डोळ्यांना दिसून येत नाही.
यामुळे कितीतरी वेळा वाहने दुभाजक ओलांडून अपघात घडल्याचे दिसून येते. या महामार्गवरील औद्योगिक क्षेत्र भोसरी, चाकण, मोशी या परिसराचा झपाट्याने विकास होतं असून रहदारी वाढली आहे. यामुळे महामार्गावर सुरक्षा राखणे ही महत्त्वाची जबाबदारी असून वाहनचालकांसह पादचारी नागरिकांचा जीव धोक्यात आहे.
पुणे नाशिक महामार्ग झाल्यापासून टोल वसुलीच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये जमा झाले. मात्र गेल्या दहा वर्षात महामार्गची अवस्था बघितली तर व्यवस्थापन कंपनीने महामार्गांवर दुरुस्तीकडे साफ दुर्लक्ष केले आहे.
रस्त्याची दुरवस्था, नियोजनाचा अभाव, वाढती वाहनसंख्या यामुळे नाशिक फाट्यापासून ते औद्योगिक क्षेत्र असलेल्या चाकण पर्यंतचा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. महामार्गांवर अनेक ठिकाणी दुभाजकांमध्ये अंतर पडले आहे.
या निमुळत्या जागेतून दुचाकी काढून शॉर्ट कट शोधल्या जात आहे. महामार्गांवर असणाऱ्या दुभाजकाची उंची कमी असल्यामुळे भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटल्यास थेट दुसऱ्या बाजूकडील वाहनांना सुद्धा धोकादायक ठरत आहे.
प्रशासनाकडून तात्पुरती मलमपट्टी
जय गणेश साम्राज्य चौकापासून मोशी टोलनाक्यापर्यंत या रस्त्यावर अपघातांची संख्या सर्वात जास्त आहे. या अपघातांच्या मालिकेमुळेच महामार्गावरील दुभाजकांमधील रिफ्लेक्टर नाहीसे झाले आहेत. याबाबत प्रशासनाला विचारणा होऊनही यावर तोडगा निघाला नाही.
उलट या कामाबाबतची उदासीनता दिसून आली. गेल्या पावसाळ्यात मुसळधार पावसात महामार्ग पाण्याखाली गेला असल्यामुळे राजगुरूनगर पासून ते थेट भोसरी पर्यंतचा मार्ग बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली होती.
दोन दिवस महामार्गाचे काम झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला होता. अशा मोठया प्रमाणावर घडलेल्या घटनेने सुद्धा प्रशासनाने फक्त तात्पुरती मलमपट्टी करून घेतली.
पण महामार्गावरील सुरक्षिततेचे प्रश्न मात्र आहेत तसेच असून महामार्गावरील प्रवास वाहनधारकांसाठी सुकर कधी होणार असा प्रश्न उपस्थित होतं आहे.
सहा पदरी रस्त्याचे भिजत घोंगडे
केंद्राच्या भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने सन २०१७ मध्ये नाशिक फाटा ते राजगुरूनगर खेड या २९ किलोमीटर अंतराच्या महामार्गाचे सहा पदरी रुंदीकरण करण्यासाठी निविदा प्रसिद्धीस दिली होती. या रस्त्यासाठी लागणाऱ्या जागेचे भूसंपादन हा प्रश्न पूर्णपणे निकाली लागला नाही.
शिवाय या महामार्गांवर केंद्राच्या प्रास्तावित पुणे नाशिक महामेट्रो प्रकल्पामुळे महामार्गाचे प्रश्न जैसे थे आहेत. महामार्गांवर होणारी नित्याची वाहतूक कोंडी व यामुळे पुणे नाशिक अंतर कापण्यासाठी होणारा विलंब वाढतच आहे.
त्यामुळे चाकण परिसरातील महामार्गांवर होणारा उड्डाणपूल कागदावरच राहिला आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.



