“चमत्कारी’ गंडा घालणारी टोळी गजाआड
राइस पुलिंग नावाच्या भांड्याने चमत्कारी पद्धतीने धनलाभ, असे सांगून फसवणूक
पिंपरी – राइस पुलिंग नावाच्या भांड्याद्वारे चमत्कारी पद्धतीने धनलाभ होतो, असे सांगून नागरिकांना फसविणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा युनिट दोन आणि बेंगलोर पोलिसांच्या संयुक्त पथकाने रावेत येथे केली.
सिद्धेश्वर विष्णू सोनकांबळे (वय 44, रा. शिंदेवस्ती, रावेत. मूळ रा. शिरवळ, जि. सोलापूर), बालाजी बसंतराव जानाते (वय 27, रा. चिंचवडेनगर. मूळ रा. केदारगुंठा, जि. नांदेड), अमित अरुण केदारी (वय 32, रा. पवारवस्ती, बोपोडी. मूळ रा. कवडी पिंपळगाव, ता. जि. अहमदनगर) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, चमत्कारी धनलाभ करून देणारी राइस पुलिंग भांडे विक्री करण्याच्या बहाण्याने नागरिकांना फसवल्याप्रकरणी बेंगलोरमधील कोडीगेहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. बेंगलोरचे पोलीस निरीक्षक श्रीधर पुजार यांचे पथक शहरात दाखल झाले. त्यांच्याकडून माहिती घेऊन गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. ही कारवाई आयुक्त संदीप बिष्णोई, अपर आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त आर. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक शैलेश गायकवाड, उपनिरीक्षक संजय निलपत्रेवार, कर्मचारी दिलीप चौधरी, चेतन मुंढे, नामदेव राऊत यांनी केली.
असे करायचे ते फसवणूक
आरोपी राईस पुलिंग नाव दिलेले भांडे नागरिकांना खरेदी करण्यास भाग पाडत असे. या भांड्याला आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी असून नासाला देखील हे भांडे उपयोगी आहे. या भांड्यांची किंमत मोठी आहे. आपण ते तपासणी करायला पाठवू, असे सांगून आठ-दहा नागरिकांना एकत्र करून ते भांडे तपासणीकरिता शास्त्रज्ञांकडे पाठवत असे. रिक्षा चालक किंवा इतर कोणत्याही नागरिकाला ते शास्त्रज्ञ म्हणून उभे करीत असे. अशा पद्धतीने ते नागरिकांकडून लाखो रुपये उकळत होते.





