Mira-Bhayandar : मिरा भाईंदर ‘जैनांची नगरी’ असल्याचा भाजप आमदाराचा दावा; मनसेने कडक शब्दात दिला इशारा
Mira-Bhayandar : पर्युषण पर्व काळात शाळेत कंदमूळ खाण्यास बंदी घालण्यावरुनही झाला वाद

Mira-Bhayandar : भाजपा आमदार नरेंद्र मेहता पुन्हा एकदा वादग्रस्त विधानामुळे चर्चेत आले आहेत. ठाण्यात २९ सप्टेंबरला झालेल्या जैन समाजाच्या कार्यक्रमात आमदार नरेंद्र मेहता यांनी मिरा भाईंदरचा उल्लेख ‘जैनांची नगरी’ असा केला आहे. मिरा भाईंदर हे मिनी राजस्थान असल्याचंही मेहता यांनी म्हटलं. त्यांच्या या वक्तव्यावर मनसेकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
मनसे विधानसभा अध्यक्ष सचिन पोपळे यांनी मिरा भाईंदर हे केवळ एका समाजाचे शहर नसून आगरी, कोळी आणि मराठी समाजासह विविध समाजांचे शहर असल्याचे पोपळे यांनी म्हटले आहे. मेहतांच्या वक्तव्यामुळे शहरात मराठी-अमराठी किंवा विविध समाजांमध्ये वाद वाढवण्याचे काम होत असल्याचा आरोप पोपळे यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले नरेंद्र मेहता?
एका कार्यक्रमदरम्यान आमदार नरेंद्र मेहता म्हणाले की, “आपली जबाबदारी आणखी वाढली आहे, आपले कर्तव्य आणखी वाढले आहे. कारण सन्मानाचे ओझे हे सर्वात मोठे असते, ज्याचे ऋण किंवा ते उधार तुम्ही कोणत्याही जन्मात फेडू शकत नाही. जो सन्मान मिळाला आहे, आता तो तुम्ही कोणत्या ना कोणत्या रूपात समाजाला चांगल्या कामाच्या माध्यमातून परत करण्याचा प्रयत्न करा. हे प्रोत्साहनासाठी आहे, हे आपल्याला आणखी एक प्रेरणा देते की आयुष्यात चांगली कामे करत राहा.”
पुढे मेहता म्हणाले, “मी अशा नगरीतून येतो ज्याला ‘मिनी राजस्थान’ देखील म्हटले जाते, जैन लोकांची नगरी देखील म्हटले जाते. ३३ पेक्षा जास्त जैनालये आमच्या शहरात आहेत. मी सर्वांना सोबत घेऊन काम करतोय. पण माझ्या समाजाचा अभिमान आणि गौरवही आहे. जैन समाजात माझा जन्म झाला. मीरा भाईंदरमध्ये जेव्हा जेव्हा जैन समाजाचा मुद्दा येतो तेव्हा आम्ही ताकदीने उभे राहतो,” असंही मेहता म्हणालेत.
कांदा-लसूण बंदीवरही ‘जे होईल ते बघून घेऊ’ म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर
“मी शाळाही चालवतो आणि पर्युषण पर्व काळात माझ्या शाळेत कंदमूळ खाण्यास बंदी आहे. यावरून बराच वाद झाला परंतु आम्ही मागे हटलो नाही. जे होईल ते होईल आम्ही बंदी कायम ठेवली. आमच्या शाळेत ८ दिवस बंदच ठेवले. हा आमचा विचार आहे. त्याच विचारावर आम्ही चालत आलोय,” असंही भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांनी म्हटलं. दरम्यान, नरेंद्र मेहता यांच्या विधानावर आक्षेप घेत मनसेने तीव्र विरोध दर्शवला.
मनसे नेते सचिन पोपळे यांचे प्रत्युत्तर
यावर आता मनसे नेते सचिन पोपळे यांनी यावर मेहता यांना प्रत्युत्तर दिले आहे. “नरेंद्र मेहताजी उलटे धंदे बंद करा आणि वाद वाढवण्याचे बंद करा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुम्हाला ठाम सांगते, ही कोळी, आगरी आणि मराठी माणसांचा मिरा भाईंदर आहे. त्यामुळे तुम्ही आम्हाला सांगू नका. दूसरी गोष्ट म्हणजे, लाज वाटली पाहिजे आपल्याला लहान मुलांच्या डब्ब्यामध्ये कंदमुळे बंद केली. त्याला विरोध मनसेने केला. अविनाश जाधव आणि आम्ही शाळेत भेट दिल्यानंतर तुमच्या प्रिंसिपलने संध्याकाळपर्यंत जर हे पोर्टलवरनं मागे नाही घेतलं.
तुम्हाला लहान मुलांच्या डब्ब्यामध्ये कंदमुळे चालत नाही, पण तुम्हाला तुमच्या व्यवसायात, तुमच्या दोन हॉटेलमध्ये सगळं चालतं. एका हॉटेलमध्ये तर तुम्ही दारू विकता, तिकडे सगळी कंदमुळे विकली जातात. दुसऱ्या हॉटेलमध्ये, सेव्हन इलेव्हन क्लबमध्ये, त्या ठिकाणीही असेच प्रकार चालतात. म्हणजे तुम्हाला शाळेमध्ये धर्म लागतो आणि व्यवसायात आणि पैसे कमवण्यासाठी धर्म लागत नाही, त्यामुळे ही डबल ढोलकी जी वाजवायची आहे, ती बंद करा.
तुमचं काय म्हणणं आहे? आमदार जैन आहे, महापौर जैन आहे, ९ नगरसेवक जैन आहेत, अरे ही कुठली मस्ती आली आहे तुम्हाला? मिरा भाईंदर हे आगरी, कोळी आणि मराठी माणसांचा आहे, या ठिकाणी ३५ मराठी नगरसेवक आहेत, पण काय करणार, तुमच्या खाली बसून आहेत ना ते, त्यामुळे ते आवाज उचलत नाहीत, पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा असा एक पक्ष आहे की, मराठी माणसांसाठी प्रत्येक वेळेला आवाज उचलेल,” असा इशाराही मनसेने दिला.
हेही वाचा:
Rahul Gandhi: ‘फॉर्म 6 वर हा आदेश कोणी दिला?’ ; राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर थेट सवाल






