झिवाला धमकी देणाऱ्या अल्पवयीन मुलाला अटक

नवी दिल्ली – चेन्नई सुपरकिंग्सचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा आपीएलमधील खराब प्रदर्शनामुळे एका चाहत्याने चक्क माहीची पाच वर्षीय कन्या झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी दिली होती. तसेच धोनीची पत्नी साक्षीच्या सोशल मीडिया अकाउंटवर अश्लील कमेंट्सदेखील केल्या होत्या. यावर पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोशल मीडियावरून साक्षीला शिवीगाळ आणि झिवाला धमकी देण्यात आली होती. यानुसार झारखंड पोलिसांच्या टेक्निकल टीमने तपास सुरु केला. तेव्हा गुजरात मधील आयपी अॅड्रेसवरून हा मजकूर अपलोड केल्याचे समोर आले. त्यावरून धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुजराथच्या कच्छ मधून मुंद्रा येथून अटक करण्यात आली.
महत्वाचे म्हणजे ही व्यक्ती बारावीमध्ये शिकत असलेला १६ वर्षाचा मुलगा असल्याचे गुजरात पोलिसांनी सांगितले. या मुलाने धमकीचा मजकूर पोस्ट केल्याची कबुली दिली असून त्याला आता झारखंड पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार आहे.
दरम्यान रांची पोलिसांनी धोनीच्या फार्महाउसवर जाऊन कुटुंबियांच्या संमतीने तक्रार दाखल करून घेतली. धोनीच्या फार्महाउस भागात सुरक्षा रक्षकांच्या शिवाय जादा पोलीस तैनात केले गेले होते आणि येणाऱ्या जाणाऱ्यांवर नजर ठेवली जात होती, असेही समजते.





