सचिन घायवळ शस्त्र परवाना वादावर गृहराज्यमंत्री योगेश कदमांचे स्पष्टीकरण, “मी कधीच गुन्हे दाखल असलेल्या…”

पुणे: कुख्यात गुंड नीलेश घायवळ याचा भाऊ सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी शिफारस केल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला आहे. या आरोपांना उत्तर देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले, “शस्त्र परवाना हा संबंधित पोलीस आयुक्तांच्या स्वाक्षरीने दिला जातो. मी कधीही गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची शिफारस केलेली नाही.”
सचिन घायवळ याला शस्त्र परवाना देण्याच्या प्रकरणावरून निर्माण झालेल्या वादावर कदम यांनी सविस्तर खुलासा करण्याचे आश्वासन दिले आहे. ते म्हणाले, “लवकरच मी पत्रकार परिषद घेऊन सर्व कागदपत्रांसह या प्रकरणाची सत्यता उघड करेन. मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की, प्रलंबित गुन्हे असलेल्या किंवा गुन्हे दाखल असलेल्या कोणत्याही व्यक्तीला शस्त्र परवाना देण्याची शिफारस मी केलेली नाही आणि यापुढेही करणार नाही.”
सचिन घायवळचा बचाव?
सचिन घायवळ याच्यावर १५-२० वर्षांपूर्वी गुन्हे दाखल झाले होते, परंतु २०१९ मध्ये न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली असल्याचे कदम यांनी सांगितले. “गेल्या १० वर्षांत, म्हणजेच २०१५ ते २०२५ या काळात सचिन घायवळ यांच्यावर एकही गुन्हा दाखल झालेला नाही. शस्त्र परवाना देताना त्या व्यक्तीचे चारित्र्य तपासले जाते, त्याचा भाऊ किंवा नातेवाईक कोण आहेत हे पाहिले जात नाही,” असे कदम यांनी स्पष्ट केले.
आरोप आणि प्रत्यारोप –
नीलेश घायवळ हा पुण्यातील कुख्यात गुंड असून, त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न आणि लुटमारीसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. अशा व्यक्तीच्या भावाला शस्त्र परवाना देण्यासाठी शिफारस केल्याचा आरोप करत महाविकास आघाडीने योगेश कदम यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. यावर कदम यांनी आपली बाजू मांडताना सांगितले की, शस्त्र परवान्यासाठी अर्ज वैयक्तिक असतो आणि त्याची पडताळणी काटेकोरपणे केली जाते. “मी गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देण्याचे काम कधीच केले नाही आणि यापुढेही करणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
या प्रकरणावर अधिक स्पष्टता आणण्यासाठी योगेश कदम यांनी लवकरच पत्रकार परिषद घेण्याचे जाहीर केले आहे. या वादामुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, येत्या काही दिवसांत याबाबत आणखी खुलासे होण्याची शक्यता आहे.



