‘मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे का?’, धनंजय मुंडेंनी एका वाक्यातच चर्चांना दिला पूर्णविराम

Dhananjay Munde : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात काही आरोपींना अटक देखील करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत. सोबतच, मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची सातत्याने मागणी केली जात आहे.
नुकतेच धनंजय मुंडे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट देखील घेतली होती. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला का? अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. आता या चर्चांना पूर्णविराम देत धनंजय मुंडे यांनी आपण राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी धनंजय मुंडे मंत्रालयात आले होते. यावेळी त्यांना राजीनामा दिला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देताना त्यांनी ‘मी काही राजीनामा वैगरे दिलेला नाही.’, असे म्हणत त्यांनी राजीनाम्याच्या चर्चांना पूर्णविराम दिला. सोबतच, ‘मी जर राजीनामा दिला असता तर मी कॅबिनेटच्या मीटिंगला कसा आलो असतो?’, असे देखील ते म्हणाले.
दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर विरोधकांकडून सातत्याने धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘धनंजय मुंडे यांचा राजीनामा का घेतला जात नाही याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावे लागेल. याआधी ज्या ज्या वेळेस आरोप झालाय त्यावेळेस नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला आहे. आता राजीनामा मागीतला आहे. पण तेच घेत नाहीत, हे तुम्हाला सरकारला विचारावं लागेल’, असे त्या म्हणाल्या.





