पुणे – शहर आणि परिसरात हवामान कोरडे असल्याने किमान तापमानात घट होऊन थंडीत किंचित वाढ झाल्याची नोंद हवामान विभागाने घेतली आहे. दरम्यान, आगामी काही दिवस वातावरणाची ही स्थिती कायम राहील, असा अंदाज वर्तवला आहे.
मध्य महाराष्ट्रालगत असलेला चक्रवात आता मराठवाडा आणि विदर्भालगतच्या बहुतांश भागामध्ये सक्रिय आहे. त्यामुळे या भागांमधील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे.
त्याचवेळी मध्य महाराष्ट्रात हवामान कोरडे असल्याने किमान तापमानात घट होऊन थंडीत किंचित वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश भागात किमान तापमान 14 ते 18 अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे.
दरम्यान, हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार गुरुवारी (दि.28) पुण्यात किमान तापमान 12.3 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. राज्यात सर्वांत कमी किमान तापमान जळगाव येथे 10.8 अंश सेल्सिअस, तर सर्वात जास्त नांदेड येथे 34 अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले.