Mingma G Sherpa: ऑक्सिजन शिवाय 14 शिखरे चढणाऱ्या मिंग्मा जी यांचा सन्मान

काठमांडू – सुप्रसिद्ध नेपाळी गिर्यारोहक मिंग्मा जी शेर्पा यांनी पूरक ऑक्सिजनचा वापर न करता ८ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीची सर्व १४ शिखरे सर केली आहेत. ही कामगिरी करून इतिहास रचल्यानंतर शुक्रवारी त्यांचा गौरव करण्यात आला. ऑक्टोबरमध्ये ३८ वर्षीय मिंग्मा यांनी तिबेटमधील शिशपांगमा शिखर संध्याकाळी ४ वाजता त्यांनी सर केले.
पूरक ऑक्सिजनचा वापर न करता ८ हजार मीटरपेक्षा जास्त उंचीवरील सर्व १४ शिखरे सर करणारे ते नेपाळमधील पहिले गिर्यारोहक बनले आहेत. नेपाळ पर्वतारोहण संघटनेने शुक्रवारी काठमांडू येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात पर्यटन, सांस्कृतिक आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री अरुण कुमार चौधरी यांनी मिंग्मा यांचा सत्कार केला.
दोलाखा जिल्ह्यातील रोलवालिंग ग्रामीण नगरपालिकेत जन्मलेल्या मिंग्माने २००७ मध्ये पहिल्यांदा एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च शिखर सर केले आणि ४ ऑक्टोबर २०२४ रोजी माउंट शिशा पंगमा चढून आपले ध्येय पूर्ण केले. व्यवसायाने माउंटन गाइड असलेल्या मिंग्मा यांनी सहा वेळा माउंट एव्हरेस्टवर चढाई केली आहे. ते नेपाळमधील गिर्यारोहण एजन्सी इमॅजिन नेपाळचेही मालक आहेत.
नेपाळचे रहिवासी असल्याने आपण ८ हजार मीटरपेक्षा जास्त उंची असलेली सर्व १४ उंच शिखरे ऑक्सिनशिवाय सर करण्याचा संकल्प केला होता. आंतरराष्ट्रीय क्षेत्रात माझ्या देशाची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी ही कामगिरी केल्याचे त्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले.
देशातील पर्वतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी त्यांनी सरकारला आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाणाऱ्या गिर्यारोहकांची सुटका करण्यासाठी सुसज्ज कायमस्वरूपी बचाव पथक स्थापन करण्यास सांगितले. सुसज्ज बचाव पथकाअभावी अनेक शेर्पांच्या जीवाला धोका आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. २००७ ते २०२४ या कालावधीतल्या कारकिर्दीत मिंग्मा यांनी सर केलेल्या शिखरांमध्ये एव्हरेस्ट (उत्तर आणि दक्षिण दोन्ही बाजूंनी), के२ ची पाचवेळा आणि अन्नपूर्णा १, धौलागिरी, मकालू, कांचनजंगा आणि मनास्लू (सात वेळा) शिखरे यांचा समावेश आहे.





