Purandar : दूध उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात
Purandar : जानेवारी महिन्यापासून पशुखाद्याच्या ५० ते ६० किलो वजनाच्या पोत्याच्या दरात आजपर्यंत जवळपास ४०० रुपयांची, तर मागील दोन महिन्यांत २८० रुपयांची दरवाढ झाली आहे. एकीकडे दुधाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती.

वाल्हे : मागील दोन महिन्यांपासून दुधाच्या खरेदी दरात टप्प्याटप्प्याने दोन ते तीन रुपयांची वाढ होत असतानाच, दुसरीकडे पशुखाद्याच्या (गोळी पेंड, मका भुसा व इतर) दरात मात्र सातत्याने वाढ होत आहे. दर पंधरा ते वीस दिवसांनी पशुखाद्याच्या दरात ८० ते १२० रुपयांपर्यंत वाढ केली जात असल्याने, दूध दरवाढीचा प्रत्यक्ष फायदा दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात पडण्याऐवजी पशुखाद्य कंपन्यांच्या घशात जात असल्याची भावना शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
जानेवारी महिन्यापासून पशुखाद्याच्या ५० ते ६० किलो वजनाच्या पोत्याच्या दरात आजपर्यंत जवळपास ४०० रुपयांची, तर मागील दोन महिन्यांत २८० रुपयांची दरवाढ झाली आहे. एकीकडे दुधाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक दिलासा मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, दूध विक्रीतून मिळणारे वाढीव पैसे लगेचच पशुखाद्य खरेदीसाठी खर्च करावे लागत आहेत. परिणामी, दूध दरवाढ होऊनही शेतकऱ्यांच्या उत्पन्नात समाधानकारक वाढ होत नसल्याने त्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडले आहे.
पशुखाद्याच्या या दरवाढीबाबत शेतकऱ्यांनी चिंता व्यक्त करत वाल्हे (ता. पुरंदर) येथील वाल्मीकी सहकारी दूध संस्थेचे चालक धनंजय गायकवाड यांच्याकडे विचारणा केली. यावर बोलताना गायकवाड यांनी सांगितले की, कंपन्यांकडे विचारणा केली असता कच्च्या मालाच्या किमती वाढल्याचे कारण दिले जात आहे. मात्र, कच्च्या मालाच्या किमतीत नेमकी किती वाढ झाली आहे आणि त्यानुसार पशुखाद्याच्या दरात वारंवार होणारी वाढ कितपत योग्य आहे? तसेच, कच्च्या मालाच्या दरवाढीच्या नावाखाली कंपन्यांकडून मनमानी पद्धतीने दर आकारले जात आहेत का, असा सवालही शेतकरी उपस्थित करत आहेत.
दुष्काळाचा पशुधनाला फटका
दुष्काळजन्य परिस्थितीमुळे चारा विकत घेऊन पशुधन जगवणे हेच शेतकऱ्यांसमोर मोठे आव्हान बनले आहे. त्यातच पशुखाद्याचे वाढते दर आणि इतर देखभाल खर्च यामुळे दुग्धव्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडेनासा झाला आहे. उत्पादन खर्च वाढत असताना मिळणारा दर अपुरा असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे. दूध दरवाढीचा फायदा उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसेल, तर त्या दरवाढीचा उपयोग काय? असा संतप्त सवाल शेतकरी विचारत आहेत.
शासकीय नियंत्रणाची मागणी
पशुखाद्य कंपन्यांच्या वारंवार होणाऱ्या दरवाढीवर शासनाने नियंत्रण ठेवावे, कच्च्या मालाच्या किमतींची पारदर्शक माहिती तपासून दरवाढीबाबत योग्य नियमन करावे, अशी मागणी दूध उत्पादक शेतकरी सतीश भुजबळ, अमोल पवार, धनंजय गायकवाड, देवेंद्र सातपुते, भाऊसाहेब पवार, शेखर पवार आदींसह परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे. शासनाच्या दुग्धविकास विभागाने आणि लोकप्रतिनिधींनी या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





