चीन आणि पाकिस्तान यांच्यात लष्करी कवायत

इस्लामाबाद – शांघाय सहकार्य संघटनेच्या माध्यमातून चीन आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करामध्ये दहशतवाद विरोधी कवायतींचा पहिला संयुक्त सराव पाकिस्तानात आयोजित करण्यात आला होता. त्याचा सोमवारी समारोप झाला. खैबर पख्तुनवाच्या पब्बी येथील राष्ट्रीय दहशतवाद विरोधी केंद्रात हा संयुक्त उपक्रम झाला.
दहशतवाद्यांकडून होणाऱ्या उपद्रवाला पायबंद घालण्यासाठी उपलब्ध असलेले नवीन तंत्र आणि अनुभव या माहितीचे दोन्ही लष्करांनी एकमेकांना अदान-प्रदान केले. 21 सप्टेंबर पासून पंधरा दिवस हा संयुक्त सराव उपक्रम सुरू होता. या आधी दोन्ही देशांतील लष्करात 26 जुलै ते 31 जुलै या अवधीत प्रशिक्षणाचाही उपक्रम झाला होता.
नुकत्याच समारोप झालेल्या दोन आठवड्यांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात दोन्ही लष्करांनी विविध प्रात्यक्षिकांचा कसून सराव केला. त्यात नाकाबंदी, दहशतवाद्यांचा शोध, बंद दरवाजा आडच्या मोहीमा, हेलिकॉप्टर रॅपलिंग, स्फोटक हाताळणी, वैद्यकीय उपचारासाठी जखमींना तातडीने हलवणे अशा स्वरूपाच्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता.





