Milind Sathe | राज्याचे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांची निवड करण्यात आली आहे. बिरेंद्र सराफ यांनी काही महिन्यांपूर्वी महाधिवक्ता पदाचा राजीनामा दिल्याची माहिती समोर आली होती. बिरेंद्र सराफ यांच्या राजीनाम्यानंतर नवे महाधिवक्ता म्हणून मिलिंद साठे यांच्या नावावर राज्य सरकारकडून शिक्कामोर्तब केला आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नागपुरात काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मिलिंद साठे यांच्या नावावर एकमताने शिक्कामोर्तब करण्यात आला. दरम्यान, मराठा आरक्षणाचे आंदोलन सुरू असताना सप्टेंबर २०२५ मध्ये बिरेंद्र सराफ यांनी व्यक्तिगत कारण देऊन पदाचा राजीनामा दिला होता. पण महाधिवक्तापदी नव्या विधीतज्ज्ञांची निवड होत नाही तोपर्यंत काही महिने त्यांना जबाबदारी सांभाळण्याची विनंती सरकारकडून करण्यात आली होती. त्यानुसार ते महाधिवक्ता पदाची जबाबदारी पार पाडत होते. सराफ यांना डिसेंबर २०२२ मध्ये महाधिवक्ता म्हणून राज्य शासनाने नियुक्त केले होते. त्यापूर्वी जवळपास २५ वर्षांहून अधिक काळ त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम केले. डॉ. मिलिद साठे कायद्यावरील सखोल अभ्यासक दरम्यान, मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वरिष्ठ वकील म्हणून ओळख असलेले डॉ. मिलिदं साठे हे कायद्यावरील सखोल अभ्यास, कायदेशीर प्रक्रियेवरील प्रभुत्व यासाठी ओळखले जातात. त्यांनी मुंबई हायकोर्ट असोसिएशनचे अध्यक्ष म्हणूनही काम केले आहे. त्यांना विज्ञान, कला, वित्त व व्यवस्थापन या विविध क्षेत्रांतील जाण असल्याचे सांगितले जाते. मिलिंद साठे यांचा विधी विभागात दांडगा अनुभव असल्याने राज्याला त्यांच्या अनुभवाचा चांगला फायदा होईल अशी भावना व्यक्त होत आहे. Milind Sathe | हेही वाचा : हिवाळी अधिवेशनापासून ते बिग बॉस-19 च्या विजेत्यापर्यंतच्या टॉप १० बातम्या वाचा एका क्लिकवर