मिहीर शाहचे बोगस आयडी दाखवून मद्यपान; धक्कादायक माहिती आली समोर

मुंबई : वरळी हिट अँड रन प्रकरणात रोज नवनवीन खुलासे होत आहेत. शिवसेना नेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शाहने अपघातापूर्वी जुहू येथील ज्या पबमध्ये दारू पिली, ती त्याने बोगस आयडी दाखवून पिल्याचा दावा केला जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पब व्यवस्थापनाने दावा केला आहे की मिहीर शहाने त्यांना एक ओळखपत्र दाखवले होते ज्यामध्ये त्यांचे वय 27 वर्षे असल्याचे दाखवले होते. त्याच्यासोबत 3 मित्रही आले होते. तिघांचेही वय 30 वर्षांपेक्षा जास्त आहे. पोलिसांचा दावा आहे की अधिकृत नोंदीनुसार मिहीर 24 वर्षांचा आहे, तर दारू पिण्याचे किमान कायदेशीर वय 25 वर्षे आहे.
उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांच्या सूत्रांनी सांगितले की, पब बिलाच्या आधारे मिहिर आणि त्याच्या दोन मित्रांनी त्या दिवशी बारमधून व्हिस्कीचे 12 मोठे पेग मागवले होते. म्हणजे एका तरुणाने जवळपास चार पेग प्यायले होते. अल्कोहोलची ही मात्रा एखाद्या व्यक्तीला 8 तास नशेत ठेवू शकते. मिहीर आणि त्याचे मित्र शनिवार-रविवारी पहाटे 1.30 वाजता उशिरा पबमधून बाहेर पडले आणि रविवारी पहाटे 5.30 च्या सुमारास हा अपघात झाला.





