गुजरातेत पुन्हा स्थलांतरीत मजुर व पोलिसांत धुमश्चक्री

सूरत – गुजरातेतही अनेक स्थलांतरीत मजुर अडकून पडले असून त्यांनी आपल्याला गावी जाण्यास अनुमती दिली जावी या मागणीसाठी पोलिसांशी दोन हात करीत त्यांच्यावर दगडफेक केली. आज हा प्रकार सूरत जिल्ह्यातील वरेली खेड्यात घडला. त्यावेळी पोलिसांना लाठीमार व अश्रुधुराचा वापर करावा लागला.
मजुरांनी सूरत कडोदरा रस्त्यावरील अनेक वाहनांचीही मोडतोड केली. नंतर जादा पोलिस बंदोबस्त मागवून ही स्थिती नियंत्रणात आणली गेली. असाच प्रकार राजकोट जिल्ह्यातही घडला. तेथेही मजुर व पोलिसांमध्ये झटापट झाली. सूरत शहराच्या पंदेसरा भागातील 50 स्थलांतरीत मजुरांनी आपल्याला गावी जाऊ दिले जात नाही म्हणून स्वताचे डोकेच भादरून घेऊन निषेध नोंदवला.
या मजुरांचे म्हणणे असे होते की दोन दिवसांपुर्वी आम्हाला बस मधून मुळ गावी जाण्यास अनुमती दिली गेली होती पण आमच्या बसेस कोसंबा भागात पोलिसांनी अडवल्या. आणि त्यांनी आम्हाला परत या ठिकाणी पाठवले. या बसेसना अधिकृत परवानगी दिली गेली नव्हती असा पोलिसांचा आक्षेप होता. या साऱ्या प्रकारामुळे हे मजुर वैतागले आहेत. आम्हाला गावी जायला मिळेल म्हणून गेले अनेक दिवस आम्ही वाट पहात आहोत पण आमच्याकडे लक्ष द्यायलाच कोणी आले नाहीं असे त्यांचे म्हणणे होते. या बस प्रवासासाठी आम्ही खूप कष्टाने पैसे जमवले होते ते पैसेही आम्हाला बस चालकांकडून परत देण्यात आलेले नाहीत असेही या कामगारांचे म्हणणे आहे.
आम्ही आमच्याकडील घड्याळे आणि मोबाईल विकून है पैसे जमवले होते अशी माहितीही काही कामगारांनी दिली. यातील बहुतांशी मजुर उत्तरप्रदेशातील आहेत. उत्तरप्रदेश आणि गुजरात सरकारांनी आपसात संपर्क साधून आमच्या परतीची सोय करावी अशी मागणीही या मजुरांनी केली आहे. राजकोट जिल्ह्यात शापार-वेरावळ रस्त्यावर स्थलांतरीत मजुरांनी जोरदार निदर्शने केली.





