War Update : अमेरिकेच्या हवाई हल्ल्यात इराणचा सर्वात उंच पूल उद्ध्वस्त
War Update : सुमारे ४०० दशलक्ष अमेरिकी डॉलर खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता. याच वर्षाच्या सुरुवातीला या पुलाचे उद्घाटन झाले होते.

War Update : पश्चिम आशियात सुरू असलेल्या संघर्षाच्या ३४व्या दिवशी इराणला मोठा धक्का बसला आहे. अमेरिकेने केलेल्या हवाई हल्ल्यात तेहरानला करज शहराशी जोडणारा सर्वात उंच ‘बी1’ पूल पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. या हल्ल्यानंतर राजधानी तेहरानचा करजशी संपर्क तुटला आहे.
स्थानिक माध्यमांनी या हल्ल्याची पुष्टी केली असून या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच अनेक जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ल्यानंतर परिसरात भीती आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. करज शहरातील काही इतर भागांनाही लक्ष्य करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र वीज, पाणी किंवा पर्यावरणाशी संबंधित कोणतीही मोठी अडचण निर्माण झाल्याचे वृत्त नाही.
इराणी अभियांत्रिकीचा अभिमान असलेला पूल –
हल्ल्यात उद्ध्वस्त झालेला ‘बी1’ पूल हा इराणच्या आधुनिक अभियांत्रिकीचा महत्त्वाचा नमुना मानला जात होता. सुमारे १,०५० मीटर लांबीचा हा पूल आठ भागांमध्ये विभागलेला होता. त्यातील सर्वात मोठा भाग १७६ मीटरचा होता. या पुलासाठी १३६ मीटर उंच खांब उभारण्यात आला होता. सुमारे ४०० दशलक्ष अमेरिकी डॉलर खर्च करून हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला होता.
याच वर्षाच्या सुरुवातीला या पुलाचे उद्घाटन झाले होते. तेहरान आणि करज यांना जोडण्याबरोबरच आंतरराष्ट्रीय व्यापाराला गती देण्याचा उद्देश या पुलामागे होता. मात्र हवाई हल्ल्यामुळे हा महत्त्वाचा प्रकल्प काही महिन्यांतच उद्ध्वस्त झाला आहे.
१०६ वर्ष जुना पाश्चर इन्स्टिट्यूटही निशाण्यावर –
दरम्यान, इराणच्या १०६ वर्ष जुन्या प्रतिष्ठित ‘पाश्चर इन्स्टिट्यूट’वरही हल्ला करण्यात आला. इराणच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते इस्माईल बाघेई यांनी अमेरिकन-इस्रायली हल्लेखोरांनी हा हल्ला केल्याचा आरोप केला आहे.
१९२० मध्ये पॅरिसमधील पाश्चर इन्स्टिट्यूट आणि तत्कालीन इराणी सरकार यांच्यातील करारातून या संस्थेची स्थापना झाली होती. सार्वजनिक आरोग्य आणि संशोधन क्षेत्रातील पश्चिम आशियातील ही एक जुनी आणि महत्त्वाची संस्था मानली जाते. या दोन्ही हल्ल्यांमुळे पश्चिम आशियातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





