Strait of Hormuz : होर्मुज जलमार्ग अमेरिकेचा नवा भाग? ट्रम्प यांचा मोठा दावा; नकाशाही केला पोस्ट
Strait of Hormuz : इराणसोबतच्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज जलमार्ग अमेरिकेचा नवा भूभाग असल्याचा दावा केला. जलमार्गावर पूर्ण नियंत्रण असल्याचेही ते म्हणाले.

Strait of Hormuz : इराणसोबत सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी होर्मुज जलमार्गाबाबत मोठा दावा केला आहे. फारसच्या आखातातील महत्त्वाचा होर्मुज जलमार्ग हा अमेरिकेचा ‘नवा भूभाग’ असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ट्रम्प यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘ट्रुथ सोशल’वर यासंदर्भातील नकाशाही पोस्ट केला.
ट्रम्प यांनी आणखी एका पोस्टमध्ये होर्मुज जलमार्ग खुला असून, या मार्गावरून जहाजांची वाहतूक सुरू असल्याचा दावा केला. तसेच, अमेरिकन नौदलाची नाकेबंदी सुरू असून, पाण्यात टाकण्यात आलेल्या सर्व बारूदी सुरुंगांना हटवण्यात आले किंवा नष्ट करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
New media post from Donald J. Trump
( TS: Aug 18 2026, 7:09 AM ET ) pic.twitter.com/MXZtcwYrhB
— Commentary Donald J. Trump Truth Social Posts On X (@TrumpTruthOnX) August 18, 2026
‘अमेरिकेचा नवा भूभाग’
होर्मुज जलमार्गाला अमेरिकेचा भूभाग घोषित करण्याची भूमिका ट्रम्प यांनी यापूर्वीही मांडली आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पुन्हा या कल्पनेला पाठिंबा दिला. इराणच्या नाकेबंदीमुळे या जलमार्गावर अमेरिकेचे आधीच पूर्ण नियंत्रण असल्याचा दावा त्यांनी केला.
ट्रम्प म्हणाले की, ‘नाकेबंदीमुळे आमचे या मार्गावर नियंत्रण आहे. त्यामुळे होर्मुजला अमेरिकेचा भूभाग घोषित करण्याची कल्पना मला आवडते.’
इराणसोबत चर्चा नाही –
ट्रम्प यांनी इराणसोबत सध्या कोणतीही चर्चा सुरू नसल्याचे स्पष्ट केले. तसेच भविष्यातही अशी चर्चा ठरलेली नसल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे, इराणने अंतरिम शांतता करारातील अमेरिकेने दिलेली आश्वासने पूर्ण करेपर्यंत होर्मुज जलमार्ग बंद राहील, अशी भूमिका घेतल्याचे वृत्त आहे.
ट्रम्प यांनी शुक्रवारीही होर्मुज जलमार्ग अमेरिकेचा भूभाग घोषित करण्याचा विचार असल्याचे सार्वजनिकरित्या सांगितले होते. लॉंग आयलंडमधील रिपब्लिकन सभेत बोलताना त्यांनी इराणचा पराभव झाल्यानंतर हा जलमार्ग अमेरिकेचा प्रदेश घोषित करण्याचा निर्णय घेऊ शकतो, असे म्हटले होते.





