एमआयडीसीतील श्रमचोरी खपवून घेणार नाही

सणसवाडी/ लोणी काळभोर – कंपनी मालकांकडून कामगारांची पिळवणूक होत असून काही कंपनी मालकांनी तर गेल्या आठ महिन्यांपासून पगार दिलेले नाहीत, अशा कंपन्यांकडून होणारी श्रमचोरी खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख, जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कटके यांनी दिला. जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीतील अशा कंपन्यांची यादी तयार करण्यात येत असून श्रमचोरी कायद्यांतर्गत अशांवर कारवाईबाबतची दिशा ठरविण्यासाठी खासदार संजय राऊत यांच्या बरोबर बैठक घेण्यात येणार असल्याचेही कटके यांनी सांगितले.
सणसवाडी (ता. शिरूर) येथील स्मार्ट कार्ड आय टी सोल्यूशन्स लि. कंपनीतील 300 पेक्षा अधिक कामगारांना दिवाळी सरंजाम किटचे वाटप करण्यात आले. यावेळी ज्ञानेश्वर कटके यांनी ही माहिती दिली. या कंपनीने गेल्या पाच महिन्यांपासून कामगारांना वेतन दिलेले नाही, अशी कैफियत या कंपनीतील कामगारांनी कटके यांच्यापुढे मांडली होती. यामुळे कटके यांनी दिवाळी किराणा संरजाम किटचे वाटप करीत कामगारांना आधार दिला.
कटके यांनी सांगितले की, अडचणीच्या काळात समाजाच्या पाठीशी कसे उभे राहाता येईल, याचा प्रयत्न सर्वांनी करावा. कामगारांसोबत अडचणीच्या काळात नेहमीच उभा राहिलो आहे. सणवाडीतील कंपनीतील कामगारांचा प्रश्न गंभीर आहे. या पार्श्वभुमीवर इतर कंपन्यातील कामगारांकडूनही माहिती घेत आहे. अडचणीच्या काळात श्रमचोरी हा गुन्हा ठरतो. या कायद्यानुसारच अशा कंपन्यांवर कारवाई करण्याकरीता प्रयत्न करणार आहे. यासाठी खासदार राऊत यांच्याशीही चर्चा केली असून लवकरच बैठकीही घेण्यात येईल.
यावेळी भारतीय कामगार सेना युनियनचे अध्यक्ष विक्रम दरेकर, सणसवाडीचे मा. सरपंच अजित दरेकर, युनियनचे उपाध्यक्ष चंद्रकांत भोंडवे, उद्योजक नानासाहेब भाडळे, प्रमोद भाडळे, विजय हरगुडे, कामगार उपस्थित होते.





