कृत्रिम बुद्धिमत्तेला मिळणार चालना; मायक्रोसॉफ्ट करणार 25,700 कोटी रुपयांची गुंतवणूक

बंगळुरू – भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आणि क्लाऊड कम्प्युटिंग या क्षेत्रात मायक्रोसॉफ्ट कंपनी पुढील काही काळात तीन अब्ज डॉलरची म्हणजे 25,700 कोटी रुपयांची गुंतवणूक करणारा असल्याचे या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी सांगितले.
स्टार्टअपचे संस्थापक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील अधिकार्यांच्या परिषदेत बोलताना नडेला म्हणाले की, 2030 पर्यंत मायक्रोसॉफ्ट भारतात कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात मनुष्यबळ विकसित करण्यासाठी काम करणार आहे. यामुळे एक कोटी लोक कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात काम करण्यास पात्र होतील. ते म्हणाले की, आता आम्ही गुंतवणुकीची जेवढी घोषणा केली आहे तेवढी गुंतवणूक भारतात एकदाच कधीच करण्यात आली नव्हती.
कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात भारत आगेकूच करणार आहे. या क्षेत्रात आमचेही हितसंबंध आहेत. मायक्रोसॉफ्टची भारतात 300 डेटा सेंटर आहेत. त्यातील पुण्यातही काही डेटा सेंटर आहेत. दक्षिण भारत, पश्चिम भारत, मध्य भारत आणि इतर क्षेत्रात आम्ही जोमाने काम करत आहेत. त्यासाठी रिलायन्स जिओची मदत घेण्यात येत आहे.
नडेला यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली होती. यावेळी कृत्रिम बुद्धिमत्ता, उद्योजकता विकास इत्यादी विषयावर उपयोगी चर्चा झाली असे नडेला यांनी सांगितले. भारत सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातच नाही तर इतर अनेक तंत्रज्ञानस्नेही क्षेत्रात काम करत आहे. याचा फायदा आगामी पिढ्यांना मिळणार आहे. भारतात उपलब्ध असलेल्या मनुष्यबळाचा उपयोगी कामासाठी वापर वाढण्याची गरज असल्यामुळेच आम्ही 2030 पर्यंत एक कोटी लोकांना प्रशिक्षण देण्याचा निर्धार केला असल्याचे त्यांनी सांगितले.





