MI vs RR : आयपीएल २०२६ स्पर्धेतील आज (७ एप्रिल) होणाऱ्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाचा सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध (MI vs RR) गुवाहाटीतील एसीए स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यात मुंबई इंडियन्ससाठी चांगली बातमी आहे. कर्णधार हार्दिक पंड्या पूर्णपणे फिट असून तो खेळण्यासाठी उपलब्ध आहे. गेल्या सामन्यात (MI vs RR) दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त झाल्याची चर्चा होती, त्यामुळे तो खेळू शकला नव्हता. त्याच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादवने संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजी प्रशिक्षक पारस म्हांब्रे यांनी एक दिवस आधी झालेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट अपडेट दिली आहे. ते म्हणाले, “हार्दिक पंड्या उद्याच्या सामन्यासाठी उपलब्ध आहे. त्याने नेट्समध्ये चांगला सराव केला असून, तो पूर्णपणे फिट आणि ठीक आहे. तो दुखापतग्रस्त झाला नव्हता, तो फक्त आजारी होता. त्यामुळे तो गेल्या सामन्यात खेळू शकला नव्हता.” MI vs RR हार्दिक पंड्याने गुवाहाटीत रविवारी रात्री नेट्समध्ये बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही केले आणि तो चांगल्या फॉर्ममध्ये दिसला. यामुळे मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी आहे. मुंबई इंडियन्सची प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल होण्याची शक्यता हार्दिक पंड्या परत आल्यानंतर संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल अपेक्षित आहेत. गेल्या सामन्यात दिल्लीविरुद्ध हार्दिकच्या (MI vs RR) जागी कॉर्बिन बॉशला संधी देण्यात आली होती. परदेशी खेळाडूंच्या चार जागांच्या नियमामुळे ट्रेंट बोल्टला बाहेर बसावे लागले होते. आता हार्दिक परतल्याने कॉर्बिन बॉशला विश्रांती मिळू शकते आणि ट्रेंट बोल्टला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय, दीपक चहर किंवा शार्दुल ठाकूर यांपैकी एकाला बाहेर बसावे लागू शकते. दिल्लीविरुद्ध दारुण पराभव दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मुंबई इंडियन्सला ६ विकेट्स आणि ११ चेंडू शिल्लक ठेवून मोठा पराभव स्वीकारावा लागला होता. पहिल्या डावात मुंबईने केवळ १६२ धावा केल्या होत्या, जे दिल्लीने सहज पार केले. या सामन्यात हार्दिक पंड्याची कमतरता स्पष्टपणे जाणवली होती. आता राजस्थान रॉयल्सविरुद्ध मुंबई इंडियन्स दमदार पुनरागमन करण्याच्या प्रयत्नात असेल. हार्दिक पंड्याच्या पुनरागमनामुळे संघाची गोलंदाजी आणि फलंदाजी दोन्ही मजबूत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुंबई इंडियन्सने आतापर्यंतच्या आयपीएल २०२६ मोसमात मिश्रित कामगिरी केली आहे आणि आजचा सामना त्यांच्यासाठी महत्वाचा असणार आहे.