MI vs KKR : मुंबई सलामीच्या पराभवाची परंपरा मोडणार की, कोलकाता बाजी मारणार? पाहा काय सांगते? दोघांची हेड टू हेड आकडेवारी
MI vs KKR : पाचवेळा चॅम्पियन राहिलेला मुंबई इंडियन्स आणि तीनवेळा जेतेपद पटकावणारा कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणारी ही लढत क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी ठरणार आहे

MI vs KKR Head to Head Record ahead IPL 2026 : आयपीएल २०२६ चा दुसरा सामना रविवारी संध्याकाळी ७:३० वाजता मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळवला जाणार आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ गेल्या काही वर्षांपासून विजेतेपदाच्या आणि सलामीच्या सामन्यातील विजयाच्या प्रतीक्षेत आहे, तर अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील केकेआर गेल्या हंगामातील सहाव्या स्थानावरून प्रगती करण्यासाठी उत्सुक आहे.
आकडेवारी मुंबईच्या बाजूने, पण केकेआर वर्चस्वासाठी सज्ज –
मुंबई आणि कोलकाता यांच्यात आतापर्यंत ३५ सामने झाले आहेत. यामध्ये मुंबईचे पारडे जड असून त्यांनी २४ सामन्यांत बाजी मारली आहे, तर कोलकात्याला केवळ ११ सामने जिंकता आले आहेत. गेल्या हंगामात मुंबईने वानखेडेवर केकेआरचा ८ गडी राखून धुव्वा उडवला होता. मात्र, २०२४ मध्ये केकेआरने मुंबईला होम आणि अवे अशा दोन्ही सामन्यांत पराभूत करून आपले वर्चस्व सिद्ध केले होते, त्यामुळे मुंबई या संघाला हलक्यात घेण्याची चूक करणार नाही.
रोहित शर्माचा जलवा आणि नरेनची फिरकी –
The #MI Paltan set to march into a new season at home in Mumbai 😎
Could it be a 6th title for @mipaltan in 2026? 🏆#TATAIPL | #KhelBindaas | #MIvKKR pic.twitter.com/08e1baKs3e
— IndianPremierLeague (@IPL) March 29, 2026
या दोन संघांमधील सामन्यांत सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावावर आहे. ‘हिटमॅन’ने कोलकात्याविरुद्ध ४०.२९ च्या सरासरीने ९६७ धावा कुटल्या आहेत. रोहितनंतर सूर्यकुमार यादव (६१७ धावा) दुसऱ्या स्थानावर आहे. गोलंदाजीमध्ये केकेआरचा सुनील नरेन २६ विकेट्ससह अव्वल स्थानी आहे, तर मुंबईचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह २५ विकेट्ससह दुसऱ्या क्रमांकावर आहे.
हार्दिक पंड्या विरुद्ध अजिंक्य रहाणे असा हा कर्णधारांचा लढा वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाला यश मिळवून देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
वानखेडेच्या खेळपट्टीवर कोणाचे वर्चस्व राहील?
या सामन्याच्या खेळपट्टीबद्दल बोलायचे झाल्यास, वानखेडे स्टेडियम फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टी मानली जाते, जिथे दुसऱ्या डावात दव महत्त्वाची भूमिका बजावते. सुरुवातीच्या षटकांमध्ये नवीन चेंडू वेगवान गोलंदाजांना मदत करतो, तर स्टेडियमच्या अरुंद सीमांमुळे फलंदाजांना मोठे फटके खेळणे सोपे जाते. परिणामी, या सामन्यातही मोठ्या धावसंख्येची अपेक्षा करता येते.





