World Mental Health Day : “मला काही होत नाही” म्हणणारं घर
World Mental Health Day : “मी ठीक आहे” या वाक्यामागे दडलेलं मानसिक ओझं समजून घ्या. कुटुंबातील व्यक्तीचं मन ऐकणं आणि मानसिक आरोग्याची काळजी का महत्त्वाची आहे, जाणून घ्या.

World Mental Health Day : जागतिक मानसिक आरोग्य दिन विशेष | यंदाची संकल्पना : “अनुभव ऐकले जाताना : खरे आवाज, खरा बदल”
थोडं थांबून विचार करा. आज सकाळपासून तुम्ही किती वेळा “मी ठीक आहे” म्हणालात?
चहा करताना आईनं विचारलं, “अगं, डोकं दुखतंय का?” तुम्ही म्हणालात, “नाही गं, काही नाही.” ऑफिसमध्ये सहकाऱ्यानं विचारलं, “आज गप्प गप्प?” तुम्ही हसून म्हणालात, “छे, सगळं ठीक आहे.”
खरं सांगू? ते वाक्य खोटं नसतं, ते अर्धसत्य असतं. कारण त्या “ठीक आहे”च्या मागे एक थकलेलं मन उभं असतं, ज्याला कुणीतरी “खरं सांग, काय झालंय?” असं विचारायला हवं असतं.
रश्मी सकाळी सहाला उठते. डबे, नाश्ता, मुलांचा अभ्यास, मग स्वतःचं ऑफिस. रात्री सगळे झोपले की ती एकटी स्वयंपाकघरात उभी राहते आणि उगाचच डोळे भरून येतात. का, ते तिलाही कळत नाही. सकाळी पुन्हा तेच हसू आणि तेच वाक्य : “मी ठीक आहे.”
तिचा नवरा अमित रोज उशिरा घरी येतो. हप्ते, बॉसचा दबाव, घराची जबाबदारी, सगळं एकट्यानं पेलतोय असं त्याला वाटतं. “पुरुष रडत नाहीत” हे वाक्य लहानपणापासून त्याच्या कानात आहे. म्हणून तो मोबाइलमध्ये तोंड खुपसतो आणि म्हणतो, “मला काही होत नाही.”
आणि सासूबाई? आयुष्यभर सगळ्यांचं केलं, पण “तुम्ही कशा आहात?” असं त्यांना शेवटचं कोणी कधी विचारलं होतं? सुनेला वाटतं, आपलं कौतुकच होत नाही. सासूबाईंना वाटतं, आपली आता कुणाला गरजच नाही. दोघी एकाच स्वयंपाकघरात, आणि दोघींनाही वाटतं, आपलं कोणी ऐकत नाही.
एकाच घरात, एकाच छताखाली, तिघंही एकटे. यातलं कुणी ओळखीचं वाटलं का? कदाचित आरसाच दिसला असेल.
आपण असं का वागतो?
कारण लहानपणापासून आपल्याला हेच शिकवलं गेलं. “रडू नकोस.” “सहन करायला शिक.” “घरातलं घराबाहेर जाता कामा नये.” आपण ते इतकं मनावर घेतलं की भावना असणंच चुकीचं वाटायला लागलं.
पण भावना दडपल्यानं संपत नाहीत. त्या आतल्या आत साचतात आणि एक दिवस चिडचिडीतून, अबोल्यातून किंवा आजारपणातून बाहेर येतात. मग एखाद्या छोट्याशा गोष्टीवरून घरात वाद होतो, पण खरं कारण त्या गोष्टीचं नसतंच. ते महिनोन्महिने साठलेलं, न सांगितलेलं काहीतरी असतं.
मन बोलत नाही, तेव्हा शरीर बोलतं
सतत डोकेदुखी, पाठदुखी, झोप न लागणं, छोट्या गोष्टींवर चिडचिड, आवडत्या गोष्टींतला रस जाणं, माणसांपासून दूर राहावंसं वाटणं. ही कमजोरी नाही. हा तुमच्या मनाचा “मला थोडी मदत हवी आहे” असा आवाज आहे.
यंदाच्या जागतिक मानसिक आरोग्य दिनाची संकल्पना आहे, “अनुभव ऐकले जाताना : खरे आवाज, खरा बदल”. मोठ्या व्यासपीठांआधी हे आपल्या स्वयंपाकघरात आणि जेवणाच्या टेबलावर घडायला हवं. कारण मन ऐकलं गेल्यावरच शांत होतं, सल्ला मिळाल्यावर नाही.
आजपासूनच करून बघा!
दहा मिनिटं, फोन बाजूला. आज कुणाचंही बोलणं सल्ल्याशिवाय फक्त ऐका.
“ठीक आहे”च्या पलीकडे विचारा. “आज मन कसं आहे?” असं विचारून बघा आणि उत्तर येईपर्यंत गप्प राहा.
भावनेला नाव द्या. थकले आहे, भीती वाटते, एकटं वाटतं. नाव दिलं की ओझं हलकं होतं.
स्वतःसाठी पंधरा मिनिटं. चालणं, लिहिणं, शांत बसणं, काहीही.
मदत मागा. दोन आठवड्यांहून जास्त मन जड वाटत असेल, तर समुपदेशकाशी बोला. मदत मागणं ही ताकद आहे.
घर एका दिवसात बदलत नाही. पण एक ऐकणारा कान आणि एक प्रामाणिक उत्तर पुरेसं असतं. आणि आज तुम्ही खूप थकला असाल, तर तेही ठीकच आहे. तुम्ही एकटे नाही.
— मुग्धा डाके, समुपदेशक मानसशास्त्रज्ञ, पुणे





