MHT CET Result Date 2024 : ‘एमएचटी-सीईटी’चा उद्या निकाल

MHT CET Result Date 2024 : अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेली एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेचा निकाल उद्या, दि. १६ जून रोजी सायंकाळी सहा वाजता जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती राज्य सीईटी सेलकडून देण्यात आली.
बारावी निकालानंतर सर्वांना अभियांत्रिकी, औषधनिर्माण प्रवेशाचे वेध लागले असतात. मात्र यंदा बारावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अद्यापही एमएचटी-सीईटी या प्रवेश परीक्षेचा निकाल जाहीर करण्यास विलंब होत होता. त्यामुळे या निकालाचे सर्व पालक व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते.
यापूर्वी दि. १२ जून रोजीचा सीईटीला निकाल लागेल, असे जाहीर करण्यात आले. त्यानंतर दि. १९ जूनपूर्वी सीईटीला निकाल जाहीर होईल, असे कळविण्यात आले. अखेर राज्य सीईटी सेलने सीईटीच्या निकालाची तारीख आज जाहीर केली. त्यामुळे आता विद्यार्थ्यांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
राज्य सीईटी सेलमार्फत अभियांत्रिकी, औषधनिर्माण व कृषी अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेश प्रक्रिया राबविली जाते. या प्रवेशासाठी अनिवार्य असलेली एमएचटी-सीईटीसाठी राज्यातील पीसीबी ग्रुपच्या 3 लाख 41 हजार 765 विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती.
त्यातील 2 लाख 95 हजार 576 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. पीसीएम ग्रुपच्या नोंदणी केलेल्या 4 लाख 11 हजार 173 विद्यार्थ्यांपैकी 3 लाख 79 हजार 868 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या 6 लाख 75 हजार 444 एवढी आहे.





