Mhaswad News – ग्रामविकास मंत्री मा. ना. जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली म्हसवड शहरासाठी राबविण्यात येत असलेली ‘अमृत २.०’ नळपाणी पुरवठा योजना अंतिम टप्प्यात पोहोचली असून सध्या मेनलाइन पाइपलाइनचे टेस्टिंग सुरू असल्याची माहिती पालिकेचे पाणीपुरवठा सभापती युवराज सुर्यवंशी यांनी दिली. यावेळी नगराध्यक्षा सौ. पुजा विरकर यांचे पती सचिन विरकर, नगरसेवक धनाजी शिंदे उपस्थित होते. सुर्यवंशी यांनी सांगितले की, मंत्री जयकुमार गोरे यांनी दाखविलेल्या विश्वासामुळे शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व पदाधिकारी रात्रंदिवस या योजनेचा पाठपुरावा करत आहेत. सध्या योजना अंतिम टप्प्यात असून मुख्य पाइपलाइनची तपासणी सुरू आहे. या योजनेंतर्गत नीरा उजवा कालव्यातून पाणी उचलून माळशिरस तालुक्यातील इस्लामपूर येथे सुमारे २७ किमी अंतरावर साठवण तलाव आहे. तेथून हे पाणी कारखेल हद्दीतील फिल्टर टँकपर्यंत आणण्यात येत असून या दरम्यानच्या पाइपलाइनचे टेस्टिंग सुरू आहे. टेस्टिंगदरम्यान काही ठिकाणी पाइपलाइनमध्ये गळती आढळून आली आहे. शेतजमिनींचा विकास, ग्रामपंचायतींची कामे तसेच टेलिफोन केबल टाकताना झालेल्या खोदकामामुळे काही ठिकाणी पाइप फुटल्याचे निदर्शनास आले. गेल्या १५ दिवसांपासून या गळती दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू असून पालिकेचे कर्मचारीही रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. जयकुमार गोरे. त्यामुळेच शहराचा पाणीपुरवठा काही दिवस विस्कळीत झाला होता. आता बहुतांश गळती दुरुस्त करण्यात आली असून कारखेल फिल्टर टँकपर्यंत पाणी विनाअडथळा पोहोचले आहे. लवकरच हे पाणी माळशिरस चौक, शिक्षक कॉलनी, सिद्धनाथ हायस्कूल परिसर, विरकरवाडी, मसाईवाडी आदी सर्व जलटाक्यांपर्यंत पोहोचविले जाणार आहे. कारखेल येथील नव्या जलशुद्धीकरण केंद्राचे काम पूर्ण झाले असून त्याची क्षमता साडे तीन एमएलटी आहे. जुन्या केंद्राची क्षमता अडीच एमएलटी असल्याने एकूण सुमारे सहा एमएलटी पाणी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. या केंद्रात शुद्ध केलेले पाणी नागरिकांच्या घराघरात त्याच गुणवत्तेत पोहोचविण्यात येणार असल्याचेही सुर्यवंशी यांनी स्पष्ट केले. सध्या उन्हाळ्याचा काळ असल्याने टेस्टिंगचे काम अंतिम टप्प्यात असून ते लवकरच पूर्ण होईल. तोपर्यंत नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करून पालिकेला सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.