मुंबईमध्ये आपले स्वतःचे एक घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. म्हाडाने काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. मात्र या घरांच्या किमती आवाक्याच्या बाहेर असल्याने माध्यमवर्गीय लोकांनी या लॉटरीकडे पाठ फिरवली. यामुळे सरकारने आता मोठा निर्णय घेतला आहे. म्हाडाच्या लॉटरीमधील घरांच्या किमतीत मोठी कपात करण्यात आल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी केली आहे. सरकारकडून घराच्या किंमतीमध्ये १० ते २५ टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. म्हाडाच्या यावर्षीच्या लॉटरीमधील विकास नियंत्रण नियमावली ३३(७) आणि ३३ (५) मधील ३७० घरांना हा निर्णय लागू झाला आहे. यंदाच्या लॉटरीमध्ये घरांच्या किंमती कमी करण्यात आल्या असून अर्ज करण्यासाठीची मुदत १९ सप्टेंबरपर्यंत वाढविण्यात आली आहे. कोणत्या घराच्या किंमतीत किती कपात ? उच्च उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमतीत १० टक्के कपात मध्यम गटासाठी १५ टक्के अल्प गटासाठी २० टक्के तर अत्यल्प उत्पन्न गटासाठी असलेल्या घरांच्या किमती २५ टक्क्यांनी कमी होणार आहेत. म्हाडा मुंबई मंडळाकडून २०३० सदनिकांच्या विक्रीसाठी ९ ऑगस्टपासून अर्ज प्रक्रिया सुरू आली आहे. मुंबईतील पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी पवई, कन्नमवार नगर, विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड इ. गृहनिर्माण प्रकल्पामधील विविध उत्पन्न गटातील २०३० सदनिका विक्रीसाठी तयार आहेत. यासाठी ऑनलाईन नोंदणी व अर्ज करण्याच्या प्रक्रियेला ०९ ऑगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून सुरूवात झाली आहे.