Pune : म्हाडाच्या सोडतीस आणखी मुदतवाढ

पुणे : म्हाडाच्या पुणे विभागाकडील घरांच्या सोडतीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून, त्यानुसार येत्या 31 डिसेंबरपर्यंत नागरिकांना अर्ज करता येणार आहे. दरम्यान, म्हाडा 6 हजार 294 घरांसाठी आतापर्यंत सुमारे 68 हजारांपेक्षा अधिक अर्ज आले आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.
म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास दि.10 ऑक्टोबर 2024 पासून सुरुवात झाली. दिवाळी आणि विधानसभा निवडणुकीमुळे अर्ज करण्यास मुदतवाढ देण्याची मागणी नागरिकांतून करण्यात आली होती. ती मान्य करीत म्हाडाने या सोडतीस दि. 10 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ दिली होती. मात्र, नागरिकांकडून कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी आणखी मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. ती मान्य करत म्हाडाने येत्या 31 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज भरण्याची नागरिकांना संधी दिली आहे.
म्हाडाने काढलेल्या सोडतीमध्ये प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्यामधील 2 हजार 340 घरे आहेत. म्हाडाच्या विविध योजनेतील घरांची संख्या 93 आहे, प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांची संख्या 418, तर 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील सदनिकांची संख्या ही 3 हजार 312 आहे. 15 टक्के सामाजिक गृहनिर्माण योजनेतील घरांची संख्या 131 आहे.
या घरांसाठीऑनलाइन अर्जासाठी नोंदणीची मुदत दि. 31 डिसेंबरपर्यंत आहे, तर ऑनलाईन पेमेंट, अनामत रक्कम स्वीकृती अंतिम मुद्त दि. 2 जानेवारी 2025 पर्यंत आणि सोडत दि. 28 जानेवारी 2025 रोजी काढण्यात येणार आहे.
म्हाडाच्या घरांसाठीची सोडतीपूर्वीची अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया, सोडत, तसेच सोडतीनंतरची ताबा प्रक्रिया संपूर्णपणे संगणकीकरणाद्वारे ऑनलाइन पार पाडण्यात येणार असल्याने सोडतीच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आहे, अशी माहिती साकोरे यांनी दिली.
ऑनलाइन नोंदणीसाठी…
म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी अर्जदारांनी प्रथम www.mhada.gov.in अथवा https://mhada.gov.in या संकेतस्थळास भेट द्यावी, तर प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी lottery.mhada.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागणार आहे, अशी माहिती साकोरे यांनी दिली.
.




