म्हाडाच्या सदनिकांची किंमत पाऊण कोटींच्या घरात

सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर किंमत
शहरातील सर्वच गृहप्रकल्पांतील परिस्थिती
पिंपरी – पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) पिंपरीतील तीन बीएचके सदनिकांची किंमत तब्बल पाऊण कोटी रूपये ठेवण्यात आली आहे. उच्च उत्पन्न गटासाठी ही किंमत निर्धारित केली आहे. तर, पिंपरीतीलच दोन बीचएके सदनिकांची किंमत तब्बल 55 लाख 62 हजार इतकी निश्चित करण्यात आली आहे. तुलनेत सर्वसमावेशक गृहयोजनेत 26 ठिकाणी वन बीएचके सदनिका 12 लाखांपासून 26 लाखापर्यंत उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
म्हाडाने नुकतीच गृहप्रकल्पांतील सदनिकांच्या विक्रीसाठी पुणे येथे सोडत काढली. या सोडतीनंतर निवडलेल्या आणि प्रतीक्षा यादीतील लाभार्थ्यांची नावे म्हाडाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत. म्हाडातर्फे पिंपरी-चिंचवडमध्ये 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेत 26 ठिकाणी 792 सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. कमीतकमी 289.12 चौरस फूट ते जास्तीत जास्त 538.09 चौरस फुटाच्या या सदनिका आहेत. 12 लाख 20 हजार रुपयांपासून 26 लाख 14 हजार रूपयांपर्यंत या सदनिका उपलब्ध आहेत. डुडूळगाव, वाकड, चिखली, मोशी, रावेत, किवळे, पुनावळे, चोवीसावाडी, ताथवडे, चिखली, वडमुखवाडी, आळंदी रस्ता आदी ठिकाणी हे गृहप्रकल्प आहेत.
म्हाडा गृहनिर्माण योजनेतंर्गत उच्च आणि मध्यम उत्पन्न गटासाठी पिंपरी वाघेरे, सर्व्हे क्रमांक 309 (भाग) येथील सदनिकांची विक्री करण्यात येणार आहे. मध्यम उत्पन्न गटासाठी येथे दोन बीएचकेच्या 99 सदनिका आहेत. प्रति सदनिका चटई क्षेत्रफळ 606.87 चौरस फूट इतके आहे. प्रति सदनिका अंदाजे किंमत 55 लाख 62 हजार 500 रुपये इतकी निश्चित केली आहे. उच्च उत्पन्न गटासाठी 3 बीएचकेमधील 65 सदनिका उपलब्ध आहेत. प्रति सदनिकेचे चटई क्षेत्रफळ 822 ते 823.66 चौरस फूट इतके आहे. प्रति सदनिकेची अंदाजे किंमत 74 लाख 68 हजार 409 इतकी निश्चित करण्यात आली आहे.
सर्वसाधारण नागरिकांसाठी ठेवण्यात आलेल्या किंमतीही प्रमाणापेक्षा अधिक असल्याने म्हाडाच्या सदनिकाही आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेल्या आहेत. बाजारात मंदीसदृष्य स्थिती असताना सर्वच गटांतील किंमती प्रमाणापेक्षा अधिकच असल्याचे या सदनिका घेऊ इच्छिणऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.





