MHADA : हक्काच्या घरासाठी झुंबड! म्हाडाच्या 6 हजार घरांसाठी महिनाभरात 28 हजारांहून अधिक अर्ज दाखल..वाचा सविस्तर

प्रभात वृत्तसेवा
पुणे – म्हाडाने पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि पीएमआरडीएमधील 6 हजार 168 घरांसाठी मागील एक महिन्यात सुमारे 28 हजारांहून अधिक अर्ज आले आहेत, अशी माहिती म्हाडा पुणे विभागाचे मुख्य अधिकारी राहुल साकोरे यांनी दिली.म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास 11 सप्टेंबरपासून सुरुवात झाली. म्हाडाच्या घरांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हाडाच्या घरांच्या सोडतीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता अर्जदारांनी प्रथम www.housing.mhada.gov.in या संकेतस्थळवार भेट द्यावी.
तसेच, प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील योजनांच्या सदनिकांसाठी www.bookmayhome.mhada.gov.in तसेच lottery.mhada.gov.in या संकतेस्थळावर भेट द्यावी, असे आवाहन म्हाडाकडून करण्यात आले आहे.यंदा सोडतीच्या संगणक प्रणालीच्या पारदर्शकतेमध्ये आणखी भर घालण्यात आल्याचा दावा म्हाडाकडून करण्यात येत आहे.
यंदा अर्ज भरण्याच्या काही बाबींमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार अर्जदार तसेच अर्जदाराच्या जोडीदाराचे आधारकार्ड व पॅनकार्ड हे डीजी लॉकर यावरूनच प्राप्त करून घेणे गरजेचे आहे. त्याकरिता अर्जदारास डीजी लॉकरवर नोंदणी करून आवश्यक माहिती अद्ययावत करावी लागणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्याची मुदत येत्या 31 ऑक्टोबरपर्यंत आहे.
अशी आहेत घरे..
– प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य योजनेतील सदनिकांची संख्या – 1,683
– म्हाडा पीएमएवाय योजनेतील सदनिका – 299
– 15 टक्के व 20 टक्के योजनेतील सदनिकांची एकूण संख्या – 4,186
– पुणे महानगरपालिका हद्दीतील सदनिका – 1,538
– पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील सदनिका – 1,534
– पीएमआरडीए हद्दीतील सदनिका – 1,114





