माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पत्नीच्या सुरक्षेत कपात, केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय

केंद्रीय गृह मंत्रालयाने माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या पत्नी गुरशरण कौर यांच्या सुरक्षा श्रेणीत कपात केली आहे. मंत्रालयाने ‘झेड प्लस’च्या जागी आता ‘झेड’दर्जाची सुरक्षा पुरवण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाद्वारे (सीआरपीएफ) ही सुरक्षा पुरवली जाईल.
माजी पंतप्रधान सिंग आणि त्यांच्या पत्नीला 2019 मध्ये मंत्रालयाने त्यांची स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (एसपीजी) सुरक्षा काढून घेतल्यानंतर सीआरपीएफची ‘झेड प्लस’ सुरक्षा दिली होती. 2013 मध्ये, सिंग यांच्या पत्नींच्या सुरक्षा श्रेमीत महिला कमांडोंचा समावेश करण्यात आला होता.
इंडियन एक्सप्रेसच्या रिपोर्टनुसार, सुत्रांनी माहिती दिली की संस्थांनी घेतलेल्या आढाव्यानंतर गेल्या आठवड्यात सिंग यांच्या पत्नीची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नवीन धोक्याचे मूल्यांकन केल्यानंतर, त्यांना कोणताही धोका आढळला नाही. संबंधित व्यक्तींना याबाबत कळवण्यात आले. त्यानंतर त्यांची सुरक्षा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आता सिंग यांच्या पत्नीकडे सीआरपीएफची ‘झेड’ दर्जाची सुरक्षा असेल. ज्यात सुरक्षेसाठी सहा बंदूकधारी आणि निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी दोन (अधिक आठ) जवान असतील. यापूर्वी ‘झेड प्लस’ सुरक्षा होती, ज्यात त्यांच्या सुरक्षेसाठी 10 सुरक्षा कर्मचारी आणि निवासस्थानाच्या सुरक्षेसाठी दोन (अधिक आठ) जवान होते.
साधारणपणे सहा प्रकारची सुरक्षा पुरवली जाते. यात एक्स, वाय, वाय प्लस, झेड, झेड प्लस आणि एसपीजी (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) दर्जाचा समावेश आहे. एसपीजी केवळ पंतप्रधान आणि त्यांच्या जवळच्या कुटुंबासाठी आहे. तर केंद्र किंवा राज्य सरकारांना धोक्याची माहिती असलेल्या कोणालाही इतर संरक्षण दर्जा प्रदान केला जाऊ शकतो.
दरम्यान, मनमोहन सिंग यांनी 2004 ते 2014 दरम्यान भारताचे पंतप्रधान म्हणून दोन वेळा कार्यभार सांभाळला होता. 26 डिसेंबर 2024 रोजी वयाच्या 92 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.





