Metro Tunnel Safety : पेठांमधील जुन्या वाड्यांचा पुनर्विकास धोक्यात? मेट्रो बोगद्याच्या घटनेनंतर पालिकेचा मोठा निर्णय..जाणून घ्या
Metro Tunnel Safety : बोगद्याच्या सुरक्षेसाठी महापालिकेचा मास्टर प्लॅन; पेठांमधील दाटीवाटीच्या बांधकामांवर आता मेट्रोचीही नजर राहाणार.

Metro Tunnel Safety : भुयारी मेट्रोच्या बोगद्यांवर असलेल्या इमारती व वाड्यांच्या पुनर्बांधणीसाठी महापालिका कडक नियमावली लागू करणार असल्याची माहिती आयुक्त नवल किशोर राम यांनी दिली. पेठांमधील दाटीवाटीच्या भागात सुरू असलेल्या बांधकामांमुळे मेट्रोला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात येत आहे.
शुक्रवार पेठ परिसरात खडक पोलिस ठाण्यासमोर एका वाड्याच्या बांधकामासाठी बोअरवेलची खोदाई सुरू असताना स्वारगेट–शिवाजीनगर मार्गावरील भुयारी मेट्रोच्या बोगद्याला भगदाड पडल्याची घटना घडली. मेट्रोच्या अधिकाऱ्यांना पाण्याची गळती आढळल्यानंतर तत्काळ तपासणी करण्यात आली. या प्रकरणी घरमालक धनंजय मोटे आणि संबंधित ठेकेदार जगताप यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
या घटनेनंतर महापालिका आणि मेट्रो प्रशासन सतर्क झाले असून पेठांमधील सुरू असलेल्या बांधकामांचे पुनरावलोकन करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पुण्यातील पेठांचा परिसर अत्यंत दाटीवाटीचा असल्यामुळे मेट्रो प्रकल्प भूमिगत करण्यात आला होता. मात्र, आता भुयारी मार्गांच्या वर मोठ्या प्रमाणावर पुनर्बांधणीची कामे सुरू असल्याने बोगद्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
स्वतंत्र नियमावली
महामेट्रोचा शिवाजी नगर ते स्वारगेट हा सहा किलोमीटरचा मेट्रो मार्ग भुयारी आहे. जमिनीखाली सुमारे १०० फूट खोल अंतरावर हा मेट्रोचा बोगदा असून त्याच्या वरील बाजूस काॅक्रिटचे अवरण केलेले आहे. हा मार्ग प्रामुख्याने फडके हौदाच्या बाजूने पुढे मंडई आणि नंतर स्वारगेटकडे जातो. यातील बहुतांश भाग हा जुन्या पुण्याचा असून त्या ठिकाणी जुने वाडे आहेत.
त्यामुळे अनेक ठिकाणी इमारतींच्या पुनर्विकासाची कामे सुरू आहेत तर काही ठिकाणी नव्याने बांधकामे सुरू आहे. या बांधकामांसाठी बोअरवेल घेतल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिका स्वतंत्र आणि सविस्तर नियमावली तयार करत आहे. या नियमावलीत मेट्रो बोगद्यांच्या वर किंवा त्याच्या परिसरात कोणतेही बांधकाम किंवा पुनर्बांधणी करण्यापूर्वी तांत्रिक तपासणी करणे.
तसेच, बोरवेल खोदण्यासाठी भूजल विभागाची स्वतंत्र परवानगी घेणे आवश्यक राहणार आहे. केवळ बांधकाम परवानगी घेऊन बोरवेल खोदाई करता येणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय, बांधकाम करताना मेट्रो प्रशासनाची परवानगी घेणे, संरचनात्मक सुरक्षिततेचा अहवाल सादर करणे आणि कामादरम्यान तांत्रिक देखरेख ठेवणे याबाबतही विचार सुरू असल्याचे आयुक्त नवल किशोर राम यांनी स्पष्ट केले.






