Pune Metro : मेट्रोच्या वेळेचा मेळ बसेना.! २४ तासांत तीन वेळा बदल
पुणे मेट्रोने शनिवारी सुरुवातीला घेतलेल्या निर्णयात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरुवातीला मेट्रो सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे जाहीर केले होते.

Pune Metro – ऐन सणाच्या दिवशी मेट्रो सेवेच्या वेळेचा मेळ महामेट्रोला बसत नसून लक्ष्मी पूजनाच्या दिवशीच्या वेळापत्रकात फक्त २४ तासांमध्ये तीन वेळा बदल मेट्रो व्यवस्थानाने केला आहे.
शुक्रवारी (दि. ६) दोन वेळा मेट्रोच्या संचालनाच्या वेळेत बदल जाहीर केल्यानंतर शनिवारी (दि. ७) पुन्हा नियमित वेळेत मेट्रोच्या दोन्ही मार्गिका चालू राहणार असल्याचे महामेट्रोने सांगितले आहे.
त्यामुळे आता रविवारी (८ नोव्हेंबर) मेट्रोची सेवा सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. सणाच्या दिवशी मेट्रोच्या वेळेत प्रशासनाने वारंवार बदल केल्याने त्यांच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
पुणे मेट्रोने शनिवारी सुरुवातीला घेतलेल्या निर्णयात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सुरुवातीला मेट्रो सेवा सकाळी ६ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे जाहीर केले होते.
त्यानंतर नागरिकांच्या आग्रहास्तव ही वेळ दोन तासांनी वाढवून रात्री ८ वाजेपर्यंत सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, रविवारी पुन्हा निर्णय बदलत पूर्ण वेळ सेवा सुरू ठेवण्याचे जाहीर केले आहे.
यापूर्वीही सणांच्या दिवशी पीएमपीएमएल, रेल्वेसारख्या इतर सार्वजनिक वाहतूक सेवा सुरू असताना मेट्रो सेवेच्या वेळेत बदल का केले जातात, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला होता.
मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असल्यास सणांच्या दिवशीही प्रवाशांना नियमित सेवा मिळणे अपेक्षित आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.
दरम्यान, सोमवारी (९ नोव्हेंबर) पासून मेट्रोची सेवा नेहमीप्रमाणे सकाळी ६ ते रात्री ११ वाजेपर्यंत सुरू राहणार आहे. तसेच, मेट्रोच्या उन्नत मार्गांजवळ फटाके वाजवू नयेत, असे आवाहनही प्रशासनाने केले.





