पुणे | खराडीपर्यंत मेट्रो फिडर बससेवा सुरू

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – रामवाडी मेट्रो स्टेशनपासून खराडी परिसरातील आयटी कंपन्यांसह, रहिवाशी नागरिकांच्या सुविधेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) रामवाडी मेट्रो स्टेशन ते ईऑन आयटी पार्क खराडीपर्यंत मेट्रो फिडर बससेवा सुरू करण्यात आली.
या सेवेचा शुभारंभ पीएमपीचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय कोलते आणि महा मेट्रो रेल पुणेचे संचालक विनोद अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी महा मेट्रो रेलचे महाव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सनेर-पाटील, पीएमपीचे चिफ ट्रान्सपोर्ट मॅनेजर सतिश गव्हाणे,
मेट्रोचे जनसंपर्क अधिकारी डॉ. हेमंत सोनवणे यांच्यासह मनोज डॅनियल, पंचशील ग्रुप आयटी पार्क खराडीचे व्हाईस प्रेसिडेंट विजितसिंग थोपटे, नारायण करडे, विजय रांजणे,
सुरेंद्र दांगट, संजय कुसाळकर, दिपक वाळुंजकर, सोमनाथ वाघोले यासह अधिकारी उपस्थित होते. या फिडर सेवेमुळे प्रवाशांचा रामवाडी मेट्रो स्टेशनपासून पुढचा प्रवास सुखकार आणि वेळेत होणार आहे.
अशा धावतील बस…
रामवाडी मेट्रो स्टेशन ते ईऑन आयटी पार्क (खराडी) तसेच ईऑन आयटी पार्क (खराडी) ते रामवाडी मेट्रो स्टेशनसाठी सकाळी ०७:३० पहिली बस त्यानंतर प्रेत्यक ३० मिनिटांनी बस सुटेल. रात्री ०9:०० वाजता शेवटची फेरी असणार आहे.
तर, वडगाव शेरी फाटा, विमाननगर कॉर्नर, चंदननगर, खराडी बायपास, जनकबाबा दर्गा, टाऊन डाऊन चौक खराडी, वर्ल्ड ट्रेड सेंटर क्र.३ व ५, ईऑन गेट नंबर २ (खराडी) असा बसमार्ग असेल.
पीएमपीकडून सुरू करण्यात आलेल्या फीडर बससेवेमुळे प्रवाशी नागरिकांना रामवाडी मेट्रो स्टेशन पर्यंत पोहोचणे सोयीचे होणार आहे.
या बसमार्गावर पर्यावरणपूरक स्मार्ट एसी ईलेक्ट्रिक बसेस संचलनात असणार आहेत. तरी प्रदूषण व वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जास्तीत जास्त प्रवाशांनी या बससेवेचा वापर करावा. – डॉ. संजय कोलते, अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल.




