Nagar | जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत पावसाचा हवामान खात्याचा इशारा

नगर, (प्रतिनिधी) – भारतीय हवामान खात्याद्वारे जिल्ह्यात २० ऑगस्टपर्यंत विजांच्या कडकडाटांसह वादळी वारा व हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.
जिल्ह्यासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील यांनी केले आहे.
मेघगर्जनेच्या वेळी विजा चमकत असताना किंवा वादळी वारे वाहत असताना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटाच्या वादळादरम्यान व विजा चमकताना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये.
विजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा,. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांच्यापासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब, धातुचे कुंपण, विद्युतवाहिनी अथवा ट्रॉन्सफॉर्मरजवळ थांबू नये.
सर्व प्रकारच्या अधांतरी लटकणाऱ्या, लोंबणाऱ्या केबल्सपासून दूर राहावे. जाहिरात फलक (होर्डिंग्ज्) कोसळून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी दक्षतेची बाब म्हणून जाहिरात फलकांच्या (होर्डिंग्ज्) आजूबाजूला थांबू नये.
नदी, ओढे व नाल्याच्या पाणीपातळीत वाढ होत असल्यास नागरिकांनी नदीपात्रातून, तसेच ओढे, नाले यापासून दूर रहावे. सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे. नदी अथवा ओढे नाल्यांवरील पुलावरून पाणी वाहत असल्यास पूल ओलांडू नये.
अतिवृष्टीमुळे भूस्खलन होण्याची व दरडी कोसळण्याची शक्यता असते. त्यादृष्टीने डोंगराच्या पायथ्याशी राहणाऱ्या लोकांनी दक्षता घ्यावी. वेळीच सुरक्षितस्थळी स्थलांतर करावे.
आपत्कालीन परिस्थितीत जवळच्या तहसील कार्यालय, पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा. जिल्हा नियंत्रण कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर येथील दूरध्वनी क्रमांक १०७७ (टोल फ्री), ०२४१-२३२३८४४ वा २३५६९४० वर संपर्क साधावा. डॉ. वीरेंद्र बडदे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, नगर.





