Satara | जिल्ह्यातील धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरती बंद

सातारा, (प्रतिनिधी) – भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या पूर्वसूचनेनुसार सातारा जिल्ह्यात दि. 30 अखेर पावसाचा रेड व ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जिल्ह्यात सध्या अतिवृष्टी होत आहे. जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे सुरक्षिततेच्या कारणास्तव जिल्ह्यातील धबधबे आणि पर्यटनस्थळांवर पर्यटकांना तात्पुरती प्रवेशबंदी करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील लिंगमळा, भिलार धबधबा, पर्यटनाचे सर्व पॉइंटस्, पाटण तालुक्यातील ओझर्डे (नवजा) व सडावाघापूर धबधबा, सातारा तालुक्यातील ठोसेघर, केळवली, वजराई-भांबवली धबधबे, कास तलाव, जावळी तालुक्यातील एकीव या धबधब्यांच्या ठिकाणी वर्षाविहारासाठी मोठ्या संख्येने पर्यटक येतात.
या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये आणि जीवित व वित्तहानी होऊ नये, याकरिता जिल्ह्यातील हे धबधबे व पर्यटनस्थळे पर्यटकांसाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.
या धबधब्यांच्या ठिकाणी आणि पर्यटनस्थळांवर जाण्यास पर्यटकांना रविवार, दि. 28 पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात बंदी घालण्यात आली आहे. या धबधब्यांकडे आणि पर्यटनस्थळांकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद करावेत. धबधब्यांच्या ठिकाणी पर्यटक जाणार नाहीत आणि त्या ठिकाणी कोणतीही अनुचित घटना घडू नये, याची दक्षता पोलीस व संबंधित गावांमधील वनहक्क समित्यांनी घ्यावी.
पर्यटनस्थळी आवश्यकतेनुसार पोलीस बंदोबस्त नेमण्यात यावा आणि आवश्यक तेथे गस्त सुरू करावी. बंदोबस्तासाठी आवश्यकतेनुसार होमगार्ड विभागाची मदत घेण्यात यावी. नियमांचे उल्लंघन करणार्यांवर कठोर कारवाई करावी. संबंधित कार्यकारी दंडाधिकारी व उपविभागीय दंडाधिकार्यांनी स्वतंत्र प्रतिबंधात्मक आदेश पारित करून, त्यांची अंमलबजावणी करावी, असे आदेश डुडी यांनी दिले आहेत.





