मेस्सीने केला सरावाचा प्रारंभ

स्पेन – ला लीगा या येथील अत्यंत प्रतिष्ठेच्या फुटबॉल स्पर्धेला येत्या काळात प्रारंभ होणार असल्याचे समोर येत आहे. बार्सिलोनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी याने आपल्या काही सहकारी खेळाडूंसह मैदानात उतरुन सरावाला सुरुवात देखील केली आहे. अर्थात सराव करताना त्यांनी सोशल डिस्टंन्सिगचे तंतोतंत पालनही केले आहे. या स्पर्धेला येत्या जूनमध्ये सुरुवात होत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मेसीने लुईस सुआरेझसह अन्य खेळाडूंसह सराव केला. यावेळी मैदानावर दाखल होताना मास्क लावले होते. मात्र, प्रत्यक्ष सराव करताना श्वास घ्यायला अडचण येऊ नये म्हणून एकमेकांपासून लांब राहात मास्क न वापरता सराव केला. या सरावासाठी मैदानावर चार गोलपोस्ट तयार करण्यात आली होती. त्यामुळे सर्व खेळाडूंना सोशल डिस्टंन्सिगचे पालनही करता आले.
बार्सिलोना व्यतीरिक्त व्हिलारिअल, ओसासुना या क्लबने देखील सरावाला प्रारंभ केला आहे. दुसरीकडे युरोपातील त्यातही इटलीतील इंटर मिलान आणि एसी मिलान या प्रसिद्ध फुटबॉल क्लबच्या खेळाडूंनीही सरावाला सुरुवात केली आहे. इटली आणि स्पेनमध्ये करोनामुळे प्रचंड हानी झाली आहे. हजारो लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. मात्र, ही परिस्थिती आता बदलत असून खेळाडूंचा सराव याचे द्योतक मानले जात आहे.




