Winter season: पारा बाराच्या घरात! वारे, धुक्यामुळे हुडहुडी…
ठिकठिकाणी पेटल्या शेकोट्या

पुणे – शहरासह जिल्ह्यात थंडी वाढली असून, गेल्या २४ तासात किमान तापमानात अर्धा ते एक अंशाने घट झाली आहे. एनडीए परिसरात शुक्रवारी (दि. १३) सर्वात कमी ११.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
बोचरे वारे, पहाटेच्या धुक्यामुळे पुणेकरांना हुडहुडी भरली असून, पुढील दोन दिवसांत गारठा आणखी वाढण्याचा अंदाज आहे. मागील आठवड्यातील संमिश्र हवामानानंतरच्या या गुलाबी थंडीने पुणेकरांना दिलासा दिला आहे. गुरुवारी एनडीए येथे १२.६ अंशांवर असलेला पारा शुक्रवारी ११.९ अंशांवर आला.
माळीण येथे १२.६, हवेलीत १३.४, शिवाजीनगरमध्ये १४.३, पाषाणमध्ये १४.५ आणि पुरंदरमध्ये १४.९ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. हडपसरमध्ये १६.६ तर मगरपट्ट्यात १८.२ अंश सेल्सिअस तापमान नोंदविले. वाढत्या गारठ्यामुळे रात्री, पहाटे ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत.
पहाटे धुक्याची चादर आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणारे पुणेकर आता स्वेटर, मफलर आणि कानटोप्या घालून घराबाहेर पडत आहेत. पहाटेची माॅर्निंग वाॅकही स्वेटर, कानटोपी घालून होत आहे.
थंडीत काय काळजी घ्यावी?
वाढत्या गारठ्यामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखीचा त्रास बळावण्याची शक्यता असते. पहाटे व रात्री घराबाहेर पडताना स्वेटर, मफलर, कानटोपी आणि हातमोजे वापरावे. शरीरातील उष्णता टिकवून ठेवण्यासाठी तीळ, गूळ, सुकामेवा, तूप आणि गरम सूपचा आहारात समावेश करावा.
थंडीत तहान कमी लागत असली तरी कोमट पाणी भरपूर प्यावे, ज्यामुळे घसा खवखवणे टाळता येते. विशेषत: लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांची काळजी घ्यावी. पहाटेच्या धुक्यात जाणे टाळावे. योगासने, प्राणायाम किंवा हलका व्यायाम नियमित करावा.
Maval News: मावळात पर्यटकांसह खवय्यांचीही मांदियाळी; पर्यटनस्थळे गजबजली





