आरटीओकडून रिक्षाचालकांना मेमो

विशेष मोहिमेंतर्गत केली कारवाई : पालकांमध्ये प्रबोधनाची होण्याची गरज
पुणे – रिक्षांतून होणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांच्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयाने दि. 25 नोव्हेंबर ते 5 डिसेंबर या कालावधीत विशेष मोहीम हाती घेतली होती. त्यामध्ये 23 रिक्षाचालकांना “मेमो’ देण्यात आला असल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली. मात्र रिक्षांमधून होणारी शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक रोखण्यासाठी पालकांमध्ये प्रबोधन होण्याची गरज आहे, असे आरटीओच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
विद्यार्थ्यांची बेकायदेशीर आणि अवैध पद्धतीने होणाऱ्या वाहतुकीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आली. या विशेष पथकांकडून होणाऱ्या कारवाईमध्ये वाहनचालकांना नोटीस देण्यात येत असून वाहनाचे कागदपत्रे ताब्यात घेत आहेत. यासह वाहनांना दंड आकारण्यात येत आहे. कार्यालयाने केलेल्या 179 वाहनांमध्ये 23 रिक्षा, 38 चारचाकी व्हॅन (नॉन ट्रान्स्पोर्ट), 52 चारचाकी व्हॅन (शालेय वाहतूक करणाऱ्या गाड्या) आणि 66 स्कूल बसचा समावेश आहे, अशी माहिती सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी अश्विनी स्वामी यांनी दिली.
शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या रिक्षांना स्कूल बस म्हणून परवानगी देण्यात येत नाही. पुणे प्रादेशिक कार्यालयातून देखील अद्याप कोणत्याही ऑटोरिक्षा मॉडेलला परवानगी दिली नसल्याची माहिती कार्यालयाकडून देण्यात आली.
विशेष मोहिमेंतर्गत आकारलेला दंड
तडजोड शुल्क 3 लाख 89 हजार रुपये
न्यायालयीन शुल्क 1 लाख 96 हजार रुपये
कर शुल्क 2 लाख 16 हजार रुपये





