श्रीनगर : येत्या ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० हटवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाला ६ वर्षे पूर्ण होत आहेत. यावरून पीपल्स डेमोक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षा आणि राज्याच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला आहे. २०१९ मध्ये जेव्हा जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा काढून घेण्यात आला तेव्हा परिस्थिती सुधारेल असा दावा करण्यात आला होता, परंतु सत्य अगदी उलट आहे. की भाजपच्या आक्रमक धोरणांमुळे जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थिती बिकट झाली आहे आणि आता येथे सतत अटकसत्र सुरू आहे अशी टीका त्यांनी केली. केंद्राने म्हटले होते की दहशतवाद संपेल आणि विकास होईल. पण ना परिस्थिती सुधारली, ना अंतर्गत शांतता आली. गेल्या ६ वर्षांपासून जम्मू आणि काश्मीरमध्ये दररोज अटक होत आहेत आणि लोक भीतीच्या छायेत जगत आहेत. लोक गप्प आहेत पण परिस्थिती आणखी बिकट झाली आहे. भाजपच्या धोरणामुळे देशात असे वातावरण निर्माण झाले आहे की आता सर्व गट संघर्षाकडे वाटचाल करत आहेत. पाकिस्तानची अर्थव्यवस्था आपल्या अर्थव्यवस्थेच्या दहावा भागही नाही मात्र आज देश पाकिस्तानशी संघर्षाच्या स्थितीत पोहोचला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार जर परिस्थिती इतकी सुधारली असेल, तर खोऱ्यात अजूनही इतकी कडक कारवाई का आहे? अशी विचारणा मेहबूबा यांनी केली आहे. मेहबूबा मुफ्तींच्या मते, कलम ३७० हटवल्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये ना गुंतवणूक आली ना राजकीय स्थिरता. त्या म्हणाल्या की या निर्णयामुळे स्थानिक लोकांचा केंद्रावरील विश्वास आणखी कमी झाला आहे. भाजपच्या आक्रमक धोरणामुळे देशाला अंतर्गत आणि बाह्य दोन्ही आघाड्यांवर अडचणीत आणले आहे.