एसटी महामंडळात १७ हजार पदांसाठी मेगाभरती; प्रताप सरनाईकांची तरुणांसाठी मोठी भेट

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) ने बेरोजगार तरुणांसाठी एका मोठ्या संधीची घोषणा केली आहे. येत्या काळात ८,००० नवीन बसेसच्या अधिग्रहणासाठी मनुष्यबळाची तीव्र गरज असल्याने, एसटी महामंडळात १७,४५० कंत्राटी पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.
यात मुख्यतः चालक आणि कंडक्टर अशा पदांचा समावेश आहे. परिवहन मंत्री तथा एसटीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाची माहिती देताना सांगितले की, हा निर्णय महामंडळाच्या विस्तार आणि सेवा सुधारणेसाठी महत्त्वपूर्ण आहे. या भरतीमुळे राज्यभरातील हजारो तरुण-तरुणींना रोजगाराची सोन्याची संधी मिळेल आणि प्रवाशांना सुरळीत सेवा मिळवता येईल.
एसटी महामंडळाच्या ३००व्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. ही भरती पूर्णपणे कंत्राटी पद्धतीने होईल आणि सुरुवातीला ३ वर्षांसाठी करार केला जाईल. निवड झालेल्या उमेदवारांना एसटीकडून पूर्ण प्रशिक्षण दिले जाईल. यामुळे ते चालक आणि कंडक्टर म्हणून प्रभावीपणे काम करू शकतील. या पदांसाठी महिन्याला कमीतकमी ३०,००० रुपयांचे वेतन मिळेल, यामध्ये इतर लाभही समाविष्ट असतील.
सरनाईक यांनी स्पष्ट केले की, ही भरती महामंडळाच्या आर्थिक सक्षमीकरण आणि तांत्रिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी आहे. भविष्यात २५,००० नवीन बसेस खरेदी करण्याच्या योजनेचा भाग म्हणून, दरवर्षी १,००० हून अधिक इलेक्ट्रिक बसेस येणार असल्याने मनुष्यबळाची आवश्यकता वाढेल. यामुळे बसेसच्या देखभालीसह प्रवाशांची गैरसोय टाळता येईल.
अशी असेल अर्ज प्रक्रिया?
ही मेगाभरती ई-निविदा प्रक्रियेद्वारे राबवली जाईल. येत्या २ ऑक्टोबरपासून निविदा प्रक्रिया सुरू होईल आणि ती सहा प्रादेशिक विभागनिहाय (मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर आणि अमरावती) पार पडेल. इच्छुक उमेदवारांना अधिकृत वेबसाइटवरून अर्ज करता येतील. ही संधी १०वी उत्तीर्ण आणि त्यानुसार पात्र असलेल्या तरुणांसाठी खुली आहे.





