Meenakshi Shinde : अखेर ! माजी महापौर मीनाक्षी शिंदेंचा राजीनामा
ठाण्याच्या माजी महापौर आणि शिंदेसेनेच्या (शिवसेना) ठाणे महिला आघाडी प्रमुख मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Meenakshi Shinde : ठाकरेंच्या शिवसेनेचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येला महिना उलटून गेला तरी ठाण्यातील राजकीय वातावरण तापलेलेच आहे. या हत्या प्रकरणात शिवसेनेच्या (शिंदे गट) नेत्या मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde)आणि त्यांचे पती मानपाडा विभागप्रमुख राजेंद्र शिंदे यांच्यावर पूर्णेकर कुटुंबीयांकडून थेट आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी गेल्या महिन्याभरापासून लावून धरण्यात आली होती.
या प्रकरणात पोलिसांनी दोघांचीही चौकशी केली होती. या सर्व गदारोळात आणि वाढत्या राजकीय दबावाच्या पार्श्वभूमीवर अखेर मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा त्याग केला आहे. पक्षाकडून कोणतीही थेट कारवाई झालेली नसताना, अंतर्गत दबाव आणि नेतृत्वाची होणारी बदनामी रोखण्यासाठी त्यांनी स्वतःहून हे मोठे पाऊल उचलल्याचे स्पष्ट झाले आहे.
एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) यांनी अत्यंत भावूक आणि स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली आहे. त्यांनी पत्रात नमूद केले की, “गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर तसेच पक्षपातळीवर माझ्याबाबत सुरू असलेले आरोप-प्रत्यारोप आणि सर्वपक्षीय विरोधकांनी एकत्र येऊन माझ्यावर केलेले आरोप पाहून पक्ष नेतृत्वास, पर्यायाने आपणांस वेठीस धरण्याचे जे षडयंत्र सुरू आहे, त्याने माझ्या मनाला प्रचंड वेदना होत आहेत. मी आजवर पक्षाचे काम पूर्ण निष्ठेने केले असून पक्षाची मान खाली जाईल असे कोणतेही कृत्य केलेले नाही. ज्या प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही, त्यात माझे नाव ओढून पक्ष आणि नेतृत्वावर दबाव आणला जात आहे.”
पुढे भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, “ज्या नेतृत्वाचा सन्मान जपण्यासाठी मी आजवर अखंड काम केले, त्याच नेतृत्वाच्या बदनामीचे कारण माझ्यामुळे व्हावे ही कल्पनाही मला सहन होत नाही. माझ्या निष्ठेची पावती आरोपांच्या माध्यमातून मिळत असल्याची खंत वाटते. म्हणूनच कोणावरही नाराज न होता, केवळ नेतृत्वाचा सन्मान आणि पक्षाची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी ठाणे जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा देत आहे.”
दरम्यान, जिल्हा महिला आघाडी प्रमुख पदाचा राजीनामा दिला असला तरी मीनाक्षी शिंदे (Meenakshi Shinde) या ठाणे महापालिकेच्या नगरसेवक पदावर कायम राहणार आहेत. याशिवाय पक्षाच्या ‘लाडकी सून’ अभियानाची जबाबदारीही त्यांच्याकडे कायम असणार आहे. दुसरीकडे, पूर्णेकर कुटुंब सातत्याने शिंदे दाम्पत्याच्या अटकेची मागणी करत असताना, मीनाक्षी शिंदे यांच्या या तडकाफडकी राजीनाम्यामुळे या प्रकरणाला आता कोणते नवे राजकीय वळण मिळते, याकडे संपूर्ण ठाण्याचे लक्ष लागले आहे.






