Medha Kulkarni : वडगाव खुर्दमधील RMC प्लांट तात्काळ हलवा; खासदार मेधा कुलकर्णींची मागणी
Medha Kulkarni : पुण्यातील सिंहगड रस्ता आणि वडगाव खुर्द परिसरातील RMC प्लांटमुळे वाढत्या प्रदूषणाबाबत खासदार मेधा कुलकर्णी यांनी प्रशासनाला धारेवर धरले

Medha Kulkarni : वडगाव खुर्द परिसरातील रेडी मिक्स काँक्रीट (RMC) प्लांटमुळे वाढते प्रदूषण आणि अपघातांच्या घटनांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. हे प्लांट तात्काळ हटवून स्थलांतरित करावेत, अशी मागणी खासदार मेधा कुलकर्णी यांनी केली आहे. (Medha Kulkarni)
सिंहगड रस्त्यालगतच्या दत्तकृष्णाई मंगल कार्यालय ते प्रयेजा सिटी, मधुकोष सोसायटी, धायरी लेन या भागातील RMC प्लांटची पाहणी करताना त्यांनी अनेक अनियमितता निदर्शनास आणल्या. प्लांट चालकांकडून पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन, वाहतूक कोंडी, तसेच धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे या गंभीर बाबी समोर आल्या.
या प्लांटमधून उडणारी सिमेंटची धूळ थेट नागरिकांच्या घरात जात असून, लहान मुले आणि वृद्धांमध्ये श्वसनाचे आजार वाढत असल्याची तक्रार स्थानिकांनी केली आहे. तसेच रेडीमिक्स वाहतूक करणाऱ्या वाहनांमधून रस्त्यावर सिमेंट सांडल्याने अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. (Medha Kulkarni)
या भागातील रहिवाशांनी यापूर्वी प्रदूषण नियंत्रण मंडळ, पुणे महापालिका आणि पोलिसांकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.
मेधा कुलकर्णी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने कारवाईचे आदेश देत, अनधिकृत प्लांट बंद करून त्यांचे स्थलांतर करण्याची मागणी केली. तसेच नंबर प्लेट नसलेल्या आणि नियम मोडणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, या भागातील विविध सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनीही प्लांटमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली असून, लवकरात लवकर उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. (Medha Kulkarni)





