Kolhapur : कोल्हापूरातून एमडी ड्रग्सचा साठा जप्त; दोघा तस्करांना ठोकल्या बेड्या

कोल्हापूर – गणेशोत्सवाची धामधूम सुरू असतानाच कोल्हापूर पोलिसांनी तस्कर मनीष नागोरी आणि समीर उर्फ साजन उर्फ पाबलो गुलाब शेख यांना बेड्या ठोकल्या आहेत. 15 लाख 51 हजार रुपये किमतीचा बारा ग्रॅम एमडी ड्रग्सचा साठा पोलिसांनी या गुन्हेगारांकडून हस्तगत केला आहे.
ऐन गणेशोत्सव काळात अमली साठा पोलिसांच्या हाताला लागल्याने कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
गणेशोत्सव काळात जिल्ह्यातील गुन्हेगार आणि 23 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या समीर उर्फ साजन शेख हा कोल्हापूर जिल्ह्यात अमली पदार्थांची तस्करी करत असल्याची माहिती मिळाल्याने पथकाने वाशी पिरवाडी सातारा येथून त्यांना ताब्यात घेतले.
चौकशीत हा साठा कुख्यात तस्कर मनीष नागोरी यांनी दिला असल्याची माहिती पुढे आली आहे. पथकाने आज पहाटे मोरवाडी तालुका करवीर येथे छापा टाकून नागोरी यांच्या मुसक्या आवळल्या आहे. तर अटक झालेल्या आरोपींना दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 18 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.





