MD Drugs Seized – अंमली पदार्थांविरोधातील मोहिमेत कामशेत पोलिसांनी मोठी कारवाई करत एमडी (मेफेड्रोन) तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे. यावेळी आरोपींकडून सुमारे २५ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना सहायक पोलीस निरीक्षक सतीश पाटील आणि त्यांच्या पथकाला मौजे चिखलसे येथे कामशेत – पवनानगर रस्त्यालगत संशयास्पद अवस्थेत काळ्या रंगाची स्कॉर्पिओ कार आढळून आली. वाहनाची तपासणी केली असता अजय उर्फ गुरू शिंदे (वय २६, रा. कामशेत गावठाण) आणि सार्थक विष्णू ढमाले (वय २०, रा. देवराम कॉलनी, कामशेत) यांच्या ताब्यात ६२.११ ग्रॅम वजनाची एमडी (मेफेड्रोन) पावडर आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये सुमारे ६ लाख २० हजार रुपये किमतीचे एमडी अंमली पदार्थ, १८ लाख रुपये किमतीची चारचाकी (एमएच १४ एमक्यू ८०१९), आणि दोन मोबाईल असा एकूण २५.२० लाख रुपयांचा ऐवज समाविष्ट आहे. दोन्ही आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार आणि उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आकाश पवार आणि पथकाने केली. या प्रकरणी कामशेत पोलीस गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक आकाश पवार करीत आहेत.