Satara: सातार्यात दहशत माजवणार्या टोळीला ‘मोक्का’
Satara शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिल्या आहेत.

Satara: शहरात दहशत निर्माण करुन, नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांकडून खंडणी गोळा करणार्या टोळीवर सातारा पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम (मोक्का) अन्वये कारवाई केली आहे. शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गंभीर गुन्ह्यांमध्ये टोळीप्रमुख प्रेम गणेश पवार (वय 22, रा. शुक्रवार पेठ, सातारा), प्रेम आबासाहेब अडागळे (वय 21, रा. शाहूपुरी), आनंद ऊर्फ अण्णा लक्ष्मण माने (वय 21, रा. दिव्यनगरी) आणि एका विधिसंघर्षग्रस्त बालकावर ही कारवाई करण्यात आली आहे.
शहरातील संघटित गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांनी दिल्या आहेत. त्यानुसार शाहूपुरी पोलिसांनी संबंधित टोळीविरुद्ध मोक्काचा प्रस्ताव तयार केला. या टोळीवर खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत करणे, पैसे हिसकावणे, मारामारी, शिवीगाळ, दमदाटी, जिवे मारण्याची धमकी देणे, बेकायदेशीर हत्यारे बाळगणे आणि हद्दपारीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल आहेत. त्यामुळे या टोळीविरोधात ‘मोक्का’ अन्वये कारवाईचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक संग्राम शेवाळे यांनी पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्यामार्फत कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे सादर केला होता. शर्मा यांनी प्रस्तावाची पडताळणी करुन, या टोळीवर मोक्का कायद्यान्वये कारवाईस मान्यता दिली. याचा तपास सातार्याचे पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
पोलीस उपअधीक्षक विपुल पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजित घोडके, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या सपोनि प्रियांका बाबर, स्थानिक गुन्हे शाखा व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि अंमलदारांनी या प्रस्तावासाठी सहकार्य केले.





