Mayawati : स्वबळावर निवडणूक लढवणार; मायावतींनी पुन्हा एकदा केले स्पष्ट

लखनौ : एकला चलो रेचा मार्ग पत्करणाऱ्या बसपच्या प्रमुख मायावती स्वबळाच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यांनी गुरूवारी संबंधित भूमिकेचा पुनरूच्चार करत कुठल्याही पक्षाशी युती-आघाडी करणार नसल्याचे स्पष्ट केले. उत्तरप्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी स्वत:च्या वाढदिवसाचे औचित्य साधून लखनौमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी पक्षाच्या रणनीतीविषयी सूतोवाच केले.
उत्तरप्रदेशातील विधानसभा निवडणूक वर्षभरावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे मायावतींनी मांडलेल्या भूमिकेचे महत्व वाढले आहे. उत्तरप्रदेशसह देशभरातील निवडणुका बसप स्वतंत्रपणे लढवेल, असे त्या म्हणाल्या. त्यांचा इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांविषयीचा (इव्हीएम) अविश्वास कायम असल्याचेही सूचित झाले. देशभरात इव्हीएमला असणारा विरोध वाढत आहे. मागील निवडणुकांत अप्रामाणिकपणा, फेरफार घडला.
तसे असले तरी बसप देशभरातील निवडणुका पूर्ण ताकदीने लढवेल, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. प्रामुख्याने उत्तरप्रदेशात प्रभाव असणारा बसप मागील काही वर्षांपासून बॅकफुटवर गेल्याचे चित्र आहे. राष्ट्रीय राजकारणातही तो पक्ष एकाकी वाटचाल करत आहे. केंद्रातील सत्ताधारी एनडीए आणि विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीपासून बसप अंतर राखून आहे.





