Mayawati | BJP – भारतीय जनता पार्टीचे नेते राघवेंद्र प्रताप सिंह यांनी मुस्लिम मुलींच्या संदर्भात केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे राजकारण तीव्र झाले आहे. बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख मायावती यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हे घृणास्पद आणि संकुचित विचारसरणीचे विधान असल्याचे म्हटले आहे. अशा लोकांवर कठोर कारवाई केली पाहिजे अशी मागणी मायावती यांनी केली आहे. मुस्लिम मुलगी आणा, नोकरी मिळवा या ताज्या संकुचित आणि घृणास्पद विधानाबरोबरच, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसह इतर राज्यांमध्ये धर्मांतर, लव्ह जिहाद आणि इतर अनेक नावांचा वापर करून आणि कायदा हातात घेऊन जातीय द्वेष, वैमनस्य, अशांतता, अराजकता भडकवणे आणि लोकांचे जीवन, मालमत्ता आणि धर्म धोक्यात आणणे, हा विषारी आणि हिंसक खेळ अत्यंत निषेधार्ह आहे, असे मायावती यांनी म्हटले आहे. असे गुन्हेगार, अराजक आणि असामाजिक घटक सुसंस्कृत आणि संवैधानिक सरकारला उघड आव्हान आणि धोका निर्माण करतात. त्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी आणि त्यांचे संरक्षण करण्याऐवजी, राज्यातील लाखो लोकांचे हित आणि कल्याण लक्षात घेऊन कायद्याचे राज्य सुनिश्चित करण्यासाठी सरकारने अशा व्यक्तींवर कठोर कायदेशीर कारवाई करावी. हे व्यापक सार्वजनिक आणि राष्ट्रीय हिताचे आहे असे मायावतींनी त्यांच्या पोस्टमध्ये नमूद केले. उत्तर प्रदेशातील सिद्धार्थनगर जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार राघवेंद्र प्रताप सिंह यांनी १६ ऑक्टोबर रोजी एका जाहीर सभेत हिंदू तरुणांना आवाहन करणारे वादग्रस्त विधान केले होते. तसेच हा अखिलेश यादव यांचा काळ नाही, जो मुस्लिमांना खुश करायचा, हा योगीजींचा काळ आहे. घाबरण्याची गरज नाही. तुम्हाला जे काही करायचे ते करा, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असे दोन हिंदू मुलींच्या कथित अपहरणाच्या घटनेनंतर ते म्हणाले होते.