Mawal News : धक्कादायक! मावळतील २३ गावे स्मशानभूमीविना; मूलभूत सुविधेअभावी ग्रामस्थ संतप्त
Mawal News : पुणे जिल्ह्यातील प्रगत मावळ तालुक्यात २३ गावे आजही स्मशानभूमीविना; पावसाळ्यात चिखलातून अंत्ययात्रा नेण्याची ग्रामस्थांवर ओढवली नामुष्की.

Mawal News – पुणे जिल्ह्यातील प्रगत तालुका म्हणून ओळख असलेल्या मावळ तालुक्यात आजही तब्बल २३ गावे स्मशानभूमीच्या मूलभूत सुविधेपासून वंचित असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंचायत समिती मावळकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक गावांमध्ये आजही अंत्यसंस्कारासाठी कायमस्वरूपी व्यवस्था उपलब्ध नसल्याने ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
विशेषतः पावसाळा आणि रात्रीच्या वेळी ही समस्या अधिक गंभीर बनत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. मावळ तालुका हा औद्योगिक, पर्यटन आणि नागरी विकासाच्या दृष्टीने झपाट्याने विकसित होणारा तालुका मानला जातो. मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग, जुना मुंबई-पुणे महामार्ग, रेल्वे संपर्क तसेच मोठ्या प्रमाणावर सुरू असलेले गृहप्रकल्प यामुळे तालुक्याची ओळख विकसित भाग म्हणून निर्माण झाली आहे. मात्र दुसरीकडे अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसारखी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध नसणे ही गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित असून विविध राजकीय पक्षांच्या सत्ताकाळातही याकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. गावोगावी विकासकामांवर कोट्यवधी रुपये खर्च केले जात असताना स्मशानभूमीसारख्या मूलभूत गरजांकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे. काही गावांमध्ये जुन्या स्मशानभूमींच्या दुरुस्तीसाठी निधी खर्च केला जातो, मात्र ज्या गावांमध्ये सुविधा अस्तित्वातच नाहीत, त्या ठिकाणी नवीन स्मशानभूमी उभारण्यासाठी ठोस पावले उचलली जात नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्मशानभूमी ही केवळ सुविधा नसून मानवी जीवनातील शेवटच्या संस्काराशी संबंधित अत्यंत संवेदनशील बाब आहे. अशा मूलभूत गरजेसाठी नागरिकांना संघर्ष करावा लागत असल्याने प्रशासनाच्या विकासाच्या दाव्यांवर प्रश्न उपस्थित होत आहेत. ग्रामस्थांच्या मते, गावागावांमध्ये रस्ते, पाणी, वीज यांसोबतच स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध करून देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.
स्मशानभूमी नसलेली गावे
येवलेवाडी, जवन, शिरे, पानसोली, देशमुखवाडी, कुंडमळा, इंगळून, कुणेवाडी, अनसुटे, कांब्रे (ना.मा.), लोखंडवाडी, उंबरवाडी, कोंडीवडे (अ.मा.), धालेवाडी, प्रभाची वाडी, मळवली, साई, नाणोली (ना.मा.), जांभवली, ठाकूर साई गावठाण, उधेवाडी, राजमाची आणि पांगोळी या गावांचा समावेश आहे. या गावांमध्ये आजही अंत्यसंस्कारासाठी योग्य जागा, शेड, पाण्याची सुविधा किंवा रस्ता उपलब्ध नसल्याचे चित्र आहे.
पावसाळ्यात परिस्थिती अधिकच बिकट
पावसात चिखल, अंधार आणि रस्त्यांचा अभाव यामुळे अंत्ययात्रा नेणेही कठीण होते. काही गावांमध्ये रात्रीच्या वेळी प्रकाशव्यवस्था नसल्याने मोबाइलच्या टॉर्चच्या सहाय्याने अंत्यसंस्कार करावे लागत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. अशा परिस्थितीत गावकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे मावळ तालुक्यातील अनेक गावे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाची आहेत. राजमाची, मळवली, जांभवली, उधेवाडी यांसारख्या गावांमध्ये दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. तरीही या भागांमध्ये मूलभूत नागरी सुविधांचा अभाव असल्याने प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
“गावात स्मशानभूमी नसल्यामुळे अंत्यसंस्कार कुठे करायचे हा मोठा प्रश्न निर्माण होतो. पावसाळ्यात उघड्यावर अंत्यविधी करावे लागतात. कोणतीही शेड किंवा पाण्याची सुविधा नाही. मृत व्यक्तीच्या कुटुंबीयांना अशा वेळी मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतो.
– सोमनाथ येवले, ग्रामस्थ
स्मशानभूमीसाठी आवश्यक जागा उपलब्ध होणे ही मुख्य अडचण आहे. काही जागा वनविभागाच्या ताब्यात आहेत, तर काही गावांपासून खूप दूर आहेत. ग्रामस्थांनी योग्य जागा उपलब्ध करून दिल्यास शासनाच्या अनुदानातून तातडीने स्मशानभूमी उभारता येईल. याबाबत काही सामाजिक संस्था आणि खासगी कंपन्यांकडेही मदतीसाठी विनंती करण्यात आली आहे.”
– सुधीर भागवत, गटविकास अधिकारी






