Maval Politics : आस्था की राजकारण? निवडणुका जवळ येताच नेत्यांना लागली अध्यात्माची ओढ, काकड आरतीत गर्दी

प्रभात वृत्तसेवा
वडगाव मावळ ( प्रभाकर तुमकर ) – निवडणुका जवळ येताच नेते मंडळींना आता अध्यात्माची ओढ लागली आहे. कोणताही धार्मिक कार्यक्रम आता राजकीय मंडळी चुकवत नाहीत. मतांचे दान पारड्यात पाडून घेण्यासाठी इच्छुक आता देव-देव करु लागले आहेत. त्यातच सध्या मावळ तालुक्याच्या गावां-गावांमध्ये काकड आरती सुरू आहे. विठुरायाच्या भक्तीने व काकड आरतीने मंगलमय आणि प्रसन्न होत असलेल्या पहाटे-पहाटे निवडणुकीसाठी इच्छुक मंडळी विठुरायाच्या चरणी आणि पर्यायाने मतदार राजाकडे साकडे घालण्यासाठी येत आहेत.
कोजागिरी पौर्णिमेपासून कार्तिकी स्नानाचा प्रारंभ झाल्याने मंदिरांमध्ये पहाटे काकड आरत्या सुरू झाल्या आहेत. या आरत्यांमध्ये मोठ्या संख्येने ग्रामस्थ, वारकरी, महिला आणि युवावर्ग सहभागी होत असल्याने इच्छुक उमेदवारांना मतदारांशी थेट संपर्क साधण्याची संधी उपलब्ध होत आहे. मंदिरात हजेरी लावून उमेदवार भाविकांना प्रसाद देतात, ग्रामस्थांना नमस्कार करून संवाद साधतात आणि आरतीनंतर महाप्रसादासाठी वर्गणीही देतात. काही गावांमध्ये इच्छुक उमेदवारांचे स्वागत आणि सत्कार केले जात असून, त्यांना महाआरतीचा मानही दिला जात आहे. त्यामुळे धार्मिक वातावरणात राजकीय रंग मिसळल्याचे दृश्य तालुक्यात दिसत आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. प्रभाग आणि आरक्षण जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघांमध्ये हालचाली वाढवल्या आहेत. काही उमेदवारांनी धार्मिक कार्यक्रम, देवदर्शन यात्रा, भोजनावळी आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्क सुरू केला आहे. नुकत्याच झालेल्या दिवाळीच्या सणानिमित्त अनेकांनी फराळ, शुभेच्छा व भेटवस्तूंचे वाटप केले. आता त्यानंतर देवदर्शन यात्रा आणि महिला मेळावे यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून मतदारांना आकर्षित करण्याची चढाओढ सुरू झाली आहे.
काकड आरत्या, देवदर्शन यात्रा, फराळ समारंभ यांमध्ये राजकीय हालचाली वाढल्या असल्या तरी नागरिक मात्र वेगळा प्रश्न विचारताना दिसत आहेत. रस्ते, पाणी, शाळा, रुग्णालय यांसारखे मूलभूत प्रश्न बाजूला ठेवून केवळ धार्मिक कार्यक्रमांवर लक्ष का दिले जाते. गावोगावी मतदार संघातील समस्या अजूनही प्रलंबित आहेत. तरीही उमेदवारांकडून त्यावर ठोस चर्चा होत नाही, अशी खंत काही स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
आस्था की राजकारण..
मंदिरात सकाळच्या वेळेला उमेदवारांची गर्दी वाढत असल्याने नागरिकांमध्ये चर्चांना उधाण आले आहे. काकड आरती श्रद्धेची की राजकीय रणनीती.. असा प्रश्न ग्रामस्थ विचारताना दिसतात. भाविकांच्या गर्दीत स्वतःचा प्रचार, वर्गणीच्या माध्यमातून नाव प्रसिद्ध करणे आणि आरतीनंतर शुभेच्छा देणे या माध्यमातून अनेक इच्छुकांनी आपला राजकीय चेहरा गावोगावी दाखवण्यास सुरुवात केली आहे.





